बाप्पांचे मोदक, खिरापत महागणार; ग्राहकांच्या खिशाला बसणार कात्री
| चौल | प्रतिनिधी |
इंधन दरवाढीने सर्वसामान्य जनता आधीच होरपळली असताना ऐन सणासुदीच्या दिवसांत दररोजच्या जेवणात लागणारा नारळ दहा रुपयांनी महागला आहे. 30 रुपयांपासून 50 रुपयांपर्यंत मिळणाऱ्या नारळाच्या किमती थेट पाच ते दहा रुपयांनी महागल्या आहेत. त्यामुळे आता रोजच्या भाजी, आमटीत खोबरे कमी वापरावे लागणार असल्याची खंत गृहिणींकडून व्यक्त केली जात आहे. नारळी पौर्णिमा, सणासुदीत खोबऱ्याचा वापर करून केले जाणारे गोडधोड यालाही नारळाच्या महागाईचा फटका बसणार आहे.
आखाती युद्धाचे कारण देत सरकारने केलेल्या इंधन दरवाढीमुळे दैनंदिन वापरातील अनेक वस्तूंच्या किमती वाढल्याने सर्वसामान्य आधीच मेटाकुटीला आले आहेत. यातच आता रोजच्या वापरातील स्वयंपाकाच्या वस्तूंच्या किमती वाढल्याने सणासुदीच्या दिवसात उसनवारीची वेळ येणार आहे. रायगडातील किनारी भागात अलिबाग, चौल, नागाव, रेवदंडा, मुरुड, श्रीवर्धनमध्येही नारळाच्या मोठ मोठ्या वाड्या आहेत. परंतु, वाढत्या किडीच्या प्रादुर्भावामुळे नारळाचे पीक धोक्यात आले आहे. पावसाळ्यात तर नारळ पिकावर अधिकचा परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे ऐन सुनासुदीच्या काळात मागणी असली, तरी आवक कमी असल्याने दरात वाढ झाली आहे.
राज्यात पावसाळ्यात उष्णता वाढल्यानं नारळ खराब होत त्यांना कीड लागली. त्यामुळं नारळाच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. दरम्यान, गणेशोत्सवामुळं नारळाची मागणी जास्त आणि आवक कमी असल्यानं नारळाचे भाव पाच ते दहा रुपयांनी वाढले आहेत. तसंच सुके खोबऱ्याची किंमत 400 रुपये किलोपर्यंत गेल्यानं गणेशोत्सवाच्या तोंडावर ग्राहकांना महागाईचा फटका बसणार आहे.
सणासुदीत प्रसाद, देवपूजा, मिठाई, मोदक या पदार्थासाठी नारळ खोबऱ्याची मोठी मागणी असते. मात्र, यंदा राज्यामध्ये पावसाळ्यात उष्णता वाढल्यानं नारळांना कीड लागली. जिथं एका झाडावर 100 नारळ येत होते, तिथं केवळ 55 ते 60 नारळ मिळात असल्यानं नारळाची आवक घटली आहे. त्यामुळं नारळ, खोबरे आणि खोबरेल तेलाचं भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. 30 ते 50 रुपयांचे नारळ आता 40 ते 60 रुपये, तर घरामध्ये वापरले जाणारे सुके खोबरे चारशे रुपये किलोपर्यंत पोहोचले आहे. खोबरेल तेलही दुपटीनं महाग झालं आहे. भाजीसाठी लागणाऱ्या शेंगदाणा तेलापासून खोबरेल तेल दुपटीनं महाग झाले आहे. अडीचशे ग्रॅम खोबरेल तेलाची बाटली तब्बल 192 रुपयांना मिळत आहे. गणेशोत्सव जवळ आल्यामुळं नागरिकांना नारळ, सुके खोबरे आणि खोबरेल तेल चढ्या भावानं विकत घ्यावं लागत आहे.
प्रसादाच्या किमती वाढणार
गणेशोत्सव सुरू होण्यास अवघे काही दिवस बाकी आहेत. या दिवसात गौरी-गणपतीला खिरापतीचा प्रसाद दिला जातो. परंतु, महत्त्वाच्या सणात नारळ महाग झाल्यानं खोबऱ्याचा कीस 600 ते 650 रुपये किलो मिळण्याचा अंदाज नारळ व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे. यासोबतच मिठाईतदेखील नारळाचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. मात्र, नारळ महागल्यानं नारळाचे मोदक, लाडू आणि मिठाईच्या दरातदेखील वाढ होणार आहे.
शहाळेदेखील महागले
आरोग्यवर्धक असलेलं शहाळेदेखील 70 रुपये नग झाल्यानं ग्राहकांच्या खिशाला कात्री लागत आहे. कमी पाण्याचे शहाळे 50 ते 60 रुपयांना, तर मलई असलेले शहाळे 80 ते 90 रुपयांना मिळत आहे. दिवाळीपर्यंत नव्याने नारळाचे चांगले पीक आल्यानंतर भाव कमी होण्याची शक्यता असल्याचे नारळ व्यावसायिक गोरख पाटील यांनी सांगितले.






