निर्माल्यापासून होणार खतनिर्मिती

श्री सदस्यांनी केले 15 टन निर्माल्य गोळा
| खरोशी | वार्ताहर |

डॉ.श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या वतीने पेण शहरासह पेण तालुक्यातील गणेश विसर्जन ठिकाणाहून 15 टन निर्माल्य गोळा करण्यात आले असून, या निर्माल्यपासून खतनिर्मिती केली जाणार आहे.

रेवदंडा येथील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे वृक्षारोपण व संगोपन, स्वच्छता अभियान, आरोग्य तपासणी शिबीर, प्रौढ साक्षरता वर्ग, तलावातील गाळ काढणे, विहीर पुनर्भरण आदी विविध सामाजिक कार्य केले जात आहेत. याबरोबरच गणेश विसर्जन वेळी निर्माल्य तलाव अथवा नदीत सोडण्यात येत असल्यामुळे होत असलेल्या पाणी प्रदूषण टाळण्यासाठी प्रतिष्ठानच्या वतीने गणेश विसर्जन वेळी निर्माल्य गोळा करुन त्याच्यापासून खतनिर्मिती करण्याचा उपक्रम देखील मागील काही वर्षांपासून हाती घेण्यात आला आहे.

यावर्षी पेण शहरातून दीड दिवसांचे 916, पाच दिवसांचे 993 तर अनंत चतुर्दशी दिवशी 217 तसेच 161 गौरींचे विसर्जन आले. पेण तालुक्यातील ग्रामीण भागात दीड दिवसांचे 1854, पाच दिवसांचे 4198, अनंत चतुर्दशी ला 791 अशा एकूण 8979 गणेशमूर्तींचे तसेच 1010 गौरींचे विसर्जन करण्यात आले.
यावेळी डॉ.श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडाच्या सदस्यांनी पेण शहरातून 4 टन व ग्रामीण भागांतून 11 असे एकूण 15 टन निर्माल्य गोळा करण्यात आले. यासाठी पेण शहरांतील 215 तर पेण तालुक्यातील वाशी नाका, वाशी, रावे, वरवणे, वरसई, सापोली, धावटे, आंबिवली, जिते, हनुमान पाडा,दादर,शिर्की, वडखळ, भाल या बैठकांतील गावाच्या अंतर्गत येणारे बैठकांतील 1347 असे एकूण 1562 श्री सदस्य सहभागी झाले होते. या गोळा केलेल्या निर्माल्य पासून सेंद्रीय खत तयार करण्यात येणार आहे.

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे कार्य म्हणजे नगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छ भारत अभियान, माझी वसुंधरा अभियान यासाठी अतिशय पूरक आणि मोलाचे आहे. हे निर्माल्य तलावात अथवा नदीमध्ये जाऊन जे प्रदूषण झाले असते, ते पूर्णतः थांबले. श्री सदस्यांनी नगरपालिकेला केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार.

– जीवन पाटील, मुख्याधिकारी, पेण नगरपालिका



Exit mobile version