रोहा तालुक्यात सापडला पाचवा किल्ला

रायगड टूर गाईडच्या सदस्यांचे यश; इतिहासात लवकरच नोंद होणार

| खांब | नंदकुमार मरवडे |

आतापर्यंत रोहा तालुक्यामध्ये अवचितगड, घोसाळेगड, सुरगड आणि बिरवाडी गड (भवानी गड) अशा चार किल्ल्यांची नोंद होती. मात्र, आता सह्याद्री मधले भटके आणि रायगड टूर गाईडच्या सदस्यांनी रोहा तालुक्यातील इतिहासाच्या आणि काळाच्या ओघात लुप्त झालेला किल्ला शोधून काढला आहे.

वाळंजवाडी गावच्या परिसरात आणि पहूर गावच्या वाटेवर एक डोंगर आहे. त्याला पूर्वी गोमाशीचा डोंगर असे नाव होते. तसेच, पहूर वाळंजवाडी आणि सभोवतालचा प्रदेश हा ऐतिहासिक शिल्प, वीरगळ व सतिशीला यांनी समृद्ध आहे. त्याचा संदर्भ घेऊन रायगड टूर गाईड सर्विसचे आनंद सानप यांनी भोवतालच्या परिसरात शोध मोहिमा आणि अभ्यास मोहिमांना सुरुवात केली. त्यांनी ही संकल्पना त्यांचे सहकारी कृष्णराम जाधव, किशोर सावरकर, सौरभ घरट व दत्तात्रेय सावंत काका यांना दिली. याआधी रायगड टूर गाईडच्या सदस्यांनी गेल्या दीड-दोन वर्षात वेगवेगळ्या शोध मोहिमा पार पाडल्या आहेत. त्यांनी या शोध मोहिमेत देखील सहकार्य करण्याची सहमती दर्शवली आणि त्याचे सार्थक झाले. या शोधमोहीमेदरम्यान वाळंज वाडी परिसरात असणाऱ्या आणि पहूर बाजूकडील असणाऱ्या गोमाशीच्या डोंगरावर त्यांना किल्ल्याचे काही अवशेष आढळून आले. त्यात त्यांना आठ पाण्याचे टाक, कौलाची खापरे, मटक्याची खापरे, तटबंदी, दगडाचे चीरे व विटांचे अवशेष असे भरपूर सारे ऐतिहासिक अवशेष मिळाले आहेत. त्यावरून हा डोंगर नसून हा एक किल्लाच आहे, असा निष्कर्ष काढण्यात आला. त्या अनुषंगाने लवकरच रोहा तालुक्यामध्ये पाचव्या किल्ल्याची ऐतिहासिक नोंद केली जाणार आहे. या शोध मोहीम संकल्पनेमध्ये आनंद सानप, शोध मोहिम सहकारी कृष्णराम जाधव, किशोर सावरकर, सौरभ घरट, केतन फुलपगारे, दत्तात्रेय सावंत आदींसह गड, दुर्ग व इतिहासप्रेमी मावळ्यांनी परिश्रम घेतले.

Exit mobile version