| पेण | प्रतिनिधी |
हावरे कंपनीकडून अतिक्रमण करुन करण्यात आलेले बांधकाम अखेर जमीनदोस्त करण्याची नामुष्की त्यांच्यावर आली. याबाबत कृषीवलने आवाज उठविल्यानंतर संबंधित प्रशासनाला जाग येऊन तात्काळ पंचमाना करण्यात आला होता. यामध्ये हावरे कंपनीने सरकारी जागेत अतिक्रमण केल्याचा अहवाल देण्यात आला. त्यामुळे हावरे कंपनीला अतिक्रमण करुन केलेले बांधकाम तोडणे भाग पाडले. याबाबत संबंधित शेतकर्यांनी ‘कृषीवल’ला धन्यवाद दिले आहेत.
मे. हावरे ग्रँड म्हटल्यानंतर एक गृहनिर्माण व्यवसायातील नाव, मात्र नाम बडे और दर्शन छोटे. पेण नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात मे. हावरे ग्रँड यांच्या तर्फे अनिल कुमार सिंघ व उज्वला सतिश हावरे यांच्या नावे सर्वे नं. 256अ/1, 256अ/2 हे सातबारे आहेत. त्याच्याच शेजारी असलेल्या 256अ/3 हा महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्र गृहनिर्माण मंडळ क्षेत्र विकास या नावाने म्हाडाचा सातबारा आहे. हावरे गु्रपने स्वतःची जागा सोडून महाराष्ट्र गृहनिर्माण मंडळ क्षेत्राच्या जागेवर बांधकाम केले होते. मात्र, शेजारी असणारे जागरूक शेतकरी अमित पाटील यांनी कृषीवलच्या मदतीने हावरे ग्रुपने केलेली घुसखोरी सर्वांच्या समोर आणली आणि कायदेशीर कारवाईची मागणी तहसीलदार, प्रांतधिकारी, जिल्हाधिकारी व मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली होती. याबाबतची पेण तहसील कार्यालयाने तात्काळ दखल घेत 5 फेब्रुवारी रोजी मंडळ अधिकारी सुजाता जाधव व पेण तलाठी अनिकेत पाटील यांना घटनास्थळी पाठवले. त्यावेळी आमचे प्रतिनिधी घटनास्थळी स्थळ पंचनामा करतेवेळी हजर होते. प्रथमदर्शनीच मंडळ अधिकारी आणि तलाठ्यांनी अतिक्रमण झाल्याचे आमच्या प्रतिनिधीला सांगितले. त्यानंतर कृषीवलमध्ये सदरील वृत्त दुसर्यावेळी प्रसिद्ध झाले. वेगवेगळ्या मार्गाने आमच्या प्रतिनिधीवर वृत्त प्रसिद्ध होऊ नये यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न केला. परंतु, सत्याची बाजू ही सत्याची बाजू होती. ती बाजू आम्ही लावून धरली. अखेर हावरे ग्रुपला आपली चूक मान्य करत महाराष्ट्र गृहनिर्माणचे सर्वे नं. 256अ/3 वरील बांधकाम काढण्यास भाग पडले. आजच्या स्थितीला गृहनिर्माण सातबारा खाली केल्याचे चित्र दिसत आहे. परंतु, चूक ही चूक असते, त्यामुळे हावरे ग्रुप विरूध्द कारवाई व्हावी, अशी प्रतिक्रिया सर्व स्तरातून पुढे येत आहे.
हे सर्व होत असताना स्थानिक शेतकरी अमित पाटील यांच्या रस्त्याचा प्रश्न निरुत्तरी आहे. आमच्या प्रतिनिधीशी बोलताना अमित पाटील यांनी सांगितले की, मी पेण नगरपालिके सोबत पत्रव्यवहार केला आहे. जोपर्यंत माझ्या रस्त्याचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत हावरे ग्रुपला बांधकामाचा परवाना देऊ नये. मुळातच हावरे ग्रुपने नगरपालिकेला चुकीची माहिती देऊन नगरपालिकेची फसवणूक केली आहे. आताही मला रस्ता न सोडता नगरपालिकेला चुकीची माहिती देऊन बांधकाम परवाना मागवू शकतील. म्हणूनच मी नगरपालिकेशी पत्रव्यवहार करून हावरे ग्रुपचे मनसुबे काय ते कळवले आहे. एकंदरीत काय तर, कृषीवलने सदरील बाब लावून धरल्याने हावरे ग्रुपला माघार घेण्यास भाग पडले आहे. प्रसार माध्यमांनी आपली भूमिका प्रामाणिक भाग पाडल्यास कितीही मोठी शक्ती असली तरी आपण केलेली चूक कबूल करावी लागते.