अंगणवाडी सेविकांच्या मागण्या मान्य; नायब तहसीलदारांनी मागितली माफी
। मुरुड । प्रतिनिधी ।
शनिवारी बीएलओचे काम करणार्या अंगणवाडी सेविकांनी सामूहिक राजीनामे दिले होते. तसेच जिल्हाधिकारी यांना निवेदन देत नायब तहसीलदार अमित पुरी यांच्या गैरवर्तनाबद्दल लेखी तक्रार दिली होती. सदरचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर तहसीलदार रोहन शिंदे यांनी बीएलओ महिलांची बैठक बोलावून वाद मिटविण्याचा प्रयत्न केला; परंतु सोमवारी हा वाद मिटला नाही. परत दुसर्या दिवशी मंगळवारी सायंकाळी दुसरी बैठक बोलावली. यावेळी महिला संघटनांच्या मध्यस्थीने हा वाद मिटला व बीएलओ महिलांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. दिवाळीचा घास काढून घेइन असे बोलणार्या नायब तहसीलदार अमित पुरी यांनी झालेल्या घटनेबद्दल खेद व्यक्त करत माफी मागितली.
या निवेदनाद्वारे नायब तहसिलदार तथा निवडणूक अधिकारी अमित पुरी यांनी महिला बीएलओना अपशब्द वापरुन मानहानी करुन मानसिक त्रास दिल्यामुळे राजीनामे दिले. तरी निवडणूक अधिकारी अमित पुरी यांनी माफी मागावी व मिटींगच्या दिवसाचा टीए डीए वेळेत मिळावा, मदतिनांच्या दिवसांचा मानधन मिळावा, मानधन वेळेत मिळावा, मतदानाच्या कामासाठी लागणारी स्टेशनरी मिळावी, मिटींगची वेळ 3 ते 5 असावी, मतदानाच्या स्लिप आठ दिवस आधी वाटण्यासाठी मिळाव्यात, मतदान झाल्यानंतर मतदान केंद्रापासून अंगणवाडी सेविका व आशा सेविकांना वाहनाने घरपोच सोडावे, 2020 ते 2022 चा थकित मानधन मिळावे या मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. या बैठकीत मुरूड तालुका महिला अध्यक्ष मृणाल खोत व माजी सभापती पंचायत समिती आशिका ठाकूर यांच्या मध्यस्थीने सर्व मागण्या मान्य करत राजीनामे मागे घेत हा वाद मिटला आहे.