अंधेरीत फार्मा कंपनीच्या गोदामाला आग

fire isolated over black background

| मुंबई | प्रतिनिधी |

अंधेरी येथील होली फॅमिली स्कूलनजीकच्या अपोलो औद्योगिक संकुलातील गोदामाला आज गुरुवारी (दि.08) सकाळी सहाच्या सुमारास अचानक आग लागली. या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही. मात्र, गोदामातील शस्त्रक्रियेच्या उपकरणांसह वैद्यकीय सामान, अन्य कार्यालयीन सामान जळून खाक झाल्याने मोठी वित्तहानी झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अपोलो औद्योगिक संकुलातील गाळा क्रमांक. 44 मध्ये सकाळी आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान, संबंधित पालिका विभाग कार्यालयातील कर्मचारी, पोलीस, अदानी इलेक्ट्रिसिटीचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मात्र, तोपर्यंत आग आणखी वाढली होती. आगीची वाढती तीव्रता लक्षात घेऊन अग्निशमन दलाने आग भीषण स्वरूपाची असल्याचे घोषित केले. आग इमारतीचे तळघर आणि पहिल्या मजल्यापर्यंत पसरली होती. ज्वाळा आणि धुरामुळे अग्निशामकांना आग विझवण्यात अडचणींचा सामना करावा लागला. आगीच्या ज्वाळांमुळे गोदामातील विद्युत तारा, विद्युत उपकरणे, कार्यालयीन कागदपत्रे, अन्य नोंदी, फर्निचर, डायपर्सचा साठा, व्हीलचेअर्स, शस्त्रक्रियेसाठी लागणारे उपकरणे, झेरॉक्स मशीन, संगणक, प्रिंटर्स आदी सामना जळून खाक झाले. प्रयत्नांची पराकाष्ठा करत सकाळी 9 वाजता आग विझविण्यात अग्निशमन दलाला यश आले. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून अग्निशमन दलातर्फे घटनेची चौकशी सुरू आहे.

Exit mobile version