। पालघर । प्रतिनिधी ।
पालघरमधील महिला आणि बालविकास कार्यालयाला बुधवारी (दि. 21) सकाळी भीषण आग लागली. या आगीत अनेक फाईल्स, कॉम्प्युटर, बांधकाम विभागाच्या फाईल्ससह साहित्य जळून खाक झाले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
पंचायत समिती कार्यालयाच्या पहिल्या माळ्यावर असलेल्या महिला बाल विकास विभागाच्या एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाला सकाळी दहा वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत कार्यालय भस्मसात झाले. सुदैवाने कर्मचारी कार्यालयात नसल्यामुळे जीवितहानीचा मोठा अनर्थ टळला. मात्र, कार्यालयातील टेबल, खुर्च्या, संगणक, शासकीय अभिलेख असे साहित्य व दस्तावेज आगीत भस्मसात झाले. आग लागताच कर्मचाऱ्यांनी अग्निरोधक यंत्रणेने आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आग आटोक्यात आली नाही. त्यानंतर पालघरच्या अग्निशमन दलाला याबाबत माहिती दिली असता अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. मात्र, तोपर्यंत अंगणवाडी सेविका मदतनीस पदाच्या नवीन भरतीच्या फाइली तसेच जुने अभिलेख पूर्णपणे जळून खाक झाले.