आदर्श शिक्षक प्रमोद भोपी यांच्या पुढाकाराने स्तुत्य उपक्रम
| अलिबाग| प्रतिनिधी |
डॉ. सुहास हळदीपूरकर यांचे लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट पनवेल, ॲब्युलन्स सेवा समिती व पुरोगामी युवक संघटना बेलोशी यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबीर अलिबाग तालुक्यातील बेलोशीतील जरीमरी आई मंदिराच्या सभागृहात पार पडले. आदर्श शिक्षक प्रमोद भोपी यांच्या पुढाकाराने हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाला गावातील ग्रामस्थ, महिला, ज्येष्ठ व तरुण मंडळींकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.
या मोफत शिबिरात लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टमधील डॉ. धनंजय साळुंखे, समन्वयक मोहन पाटील, जयेंद्र थळे यांच्या मदतीने रुग्णांच्या डोळ्यांची तपासणी करून त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. एकूण शंभरहून अधिक रुग्णांची तपासणी केली गेली. त्यामध्ये 11 मोतीबिंदू रुग्णांना तपासणीसाठी अलिबागमध्ये पाठविण्यात आले असून, या रुग्णांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती प्रमोद भोपी यांनी दिली आहे.

प्रमोद भोपी व त्यांच्या टीमने राबविलेल्या या उपक्रमाचे सर्वस्तरातून कौतूक करण्यात येत आहे. लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून रुग्णांना चांगली सेवा दिली जात असून हजारो रुग्णांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात या ट्रस्टला यश आले असल्याचे सांगण्यात आले आहे. यावेळी महेश वारगे, सुनील थळे, प्रसाद गुंड, कृष्णा वारगे, भास्कर वारगे, अजिंक्य मढवी आदी उपस्थित होते. तसेच हा उपक्रम ॲब्युलन्स सेवा समिती बेलोशीचे अध्यक्ष प्रमोद भोपी, सचिव महेंद्र विद्रे, रुग्णसेवा देणारे सेवाचालक संदेश वारगे, समिती सदस्यांच्या परिश्रमातून राबविण्यात आला.
ॲब्युलन्स सेवा समितीचा रुग्णांना आधार
अलिबाग तालुक्यातील ग्रामीण भागातील विशेष करून बेलोशी व परिसरातील रुग्णांना तातडीने आरोग्य सेवा मिळावी, म्हणून ॲब्यूलन्स सेवा समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून रुग्णवाहिकेद्वारे रुग्णांना रुग्णालयात तातडीने उपचारासाठी नेण्याचे काम केले जात आहे. पंचक्रोशीत सेवा देणारी अग्रगण्य समिती आहे. प्रत्येक रुग्णांना अलिबाग, रेवदंडा, मुंबई, पनवेल या ठिकाणी 24 तास रुग्णवाहिका सेवा देणारी परिसरातील सेवाभावी संस्था आहे. संदेश वारगे यांच्या मार्फत रुग्णांना अन्य दवाखान्यात नेण्याचे मोफत काम केले जात असल्याची माहिती ॲब्युलन्स सेवा समितीचे अध्यक्ष प्रमोद भोपी यांनी दिली आहे. ॲब्युलन्स सेवा समितीचा पाचशेहून अधिक रुग्णांना आधार मिळाल्याची महिती त्यांनी दिली आहे.