नगरपंचायतीला मुहूर्त मिळता मिळेना
| माणगाव | प्रतिनिधी |
गेली अनेक दिवस प्रतीक्षेत असलेली माणगावकरांच्या अभिमानाचा व जिव्हाळ्याचा प्रश्न बनलेली अत्याधुनिक अग्निशमन वाहन माणगावात मोठ्या दिमाखात नागरिकांच्या सेवेसाठी हजर झाले आहे. त्याला तब्बल एक महिना लोटला तरीही त्या वाहनाच्या लोकार्पणाला माणगाव नगरपंचायतील मुहूर्त मिळता मिळेना. याबाबत नागरिकात प्रचंड उत्सुकता लागली असून या अग्निशमनची लोकार्पणासाठी अग्निपरीक्षाच सुरु झाली आहे.
या अग्निशमनने 2 वर्षाची अग्नीपरीक्षा पास करून ती नागरिकांचा सेवेला दाखल झाली आहे. त्यामुळे नागरिकांची उत्सुकता शिगेला पोहोचली असून अग्निशमनमुळे माणगावकरांनी आनंदोत्सव दीपावलीपूर्वीच फटाके फोडून साजरा केला होता. हे अग्निशमन वाहन माणगावात आले असून त्याचा लोकार्पण सोहळा कार्यक्रम नगरपंचायत लवकर घेणार असल्याची माहीती मुख्याधिकारी संतोष माळी यांनी सांगितले. या वाहनाला जिल्हा नियोजन मधून मंजुरी मिळाली होती. त्यामुळे या वाहनाचे लोकार्पण करण्यासाठी रायगड पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या हस्ते करण्यासाठी तारीख मागितली होती. या लोकार्पण सोहळ्यासाठी पालकमंत्री ना. सामंत हे येणार असून त्यांच्या सोयीनुसार तारीख ठरवून हा लोकार्पण केले जाईल असे त्यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितले. मात्र लोकार्पण सोहळ्यापूर्वी एखाद्या दुर्घटनेचा कॉल आल्यास हे अग्निशमन वाहन सेवेसाठी तत्काळ घटनेठिकाणी मदतीसाठी पाठवले जाईल. यासाठी पुरेसा कर्मचारी वर्ग असून त्या कर्मचार्यांना आवश्यक ती प्रशिक्षण दिले आहे. मात्र आणखी प्रशिक्षण देण्याची गरज आहे.
अग्निशमन वाहन नुसते आग विझविण्यापुरते मर्यादित नाही. तर ते अत्याधुनिक यंत्रसामुग्रीसह विविध घटना घडल्यास अशा नैसर्गिक आपत्तीशी सामना करण्यासाठी दोन हात पुढे करण्यासाठी सरसावणार आहे. त्यामुळे ही अत्याधुनिक सुसज्य अग्निशमन नुसती माणगावकरांची शान नव्हे तर रायगडातील प्रत्येक नागरिकांच्या अभिमानाची बाब आहे. रायगडातील संभाव्य कोणत्याही नैसर्गिक आपत्तीशी मुकाबला करण्यासाठी ती सदैव सज्ज राहणार आहे. रायगड जिल्ह्यात पहिलेच सर्व सोयीनियुक्त अत्याधुनिक सुसज्य अग्निशमन वाहन माणगाव नगरपंचायतीला मंजूर 2 वर्षांपूर्वी झाले होते. सुमारे 3 कोटी 17 लाख 81 हजार रुपये शासनाला खर्च आला आहे. या वाहनात आग विझवणे, पूरग्रस्तस्थितीशी मुकाबला करणे, दरडग्रस्त भागात मदत करणे, पूल व बिल्डिंग कोसळण्यासारख्या नैसर्गिक आपत्तीसारख्या घटना घडल्यास या अग्निशमन वाहनाची निश्चितच मदत होणार आहे. या अत्याधुनिक व सुसज्य वाहनात 125 विविध प्रकारची यंत्रसामुग्रीचा समावेश असणार आहे.