फटाकेमुक्त दिवाळीचा जागर

कोरोनाकाळात प्रभावी प्रबोधन व जनजागृती
। पाली/बेणसे । वार्ताहर ।
यंदा कोरोनाचे सावट कमी झाले आहे. मात्र फटाक्यांमुळे अशा रुग्णांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. या पार्श्‍वभूमीवर समाज माध्यमांवर तसेच या आधीही फटाक्यांचे दुष्परिणाम ओळखून अनेक जिल्ह्यात संस्था, संघटना, सामाजिक कार्यकर्ते व विद्यार्थी फटकेमुक्तीसाठी विविध मार्गांनी जनजागृती व प्रबोधन करत आहेत. त्यामुळे फटाक्यांचा आवाज क्षीण होत आहे.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा रायगडचे जिल्हा कार्याध्यक्ष मोहन भोईर यांनी सांगितले की, फटाके वाजवून खरे तर विध्वंसक वृत्ती वाढू शकते. तसेच वायू व ध्वनी प्रदुषणही वाढते. पर्यावरण र्‍हासाबरोबरच सभोवतालच्या प्राण्यांना देखिल फटाक्यांचा त्रास होतो. मात्र सुखकारक बाब अशी की मागील काही वर्षांपासून जिल्ह्यात फटकेमुक्तीसाठी प्रयत्न केले जात आहेत. यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती, महाराष्ट्र शासन, जिल्हा शिक्षण विभाग यासह रोटरी क्लब सारख्या सामाजिक संघटना, काही पर्यावरण प्रेमी लोक, समाजसेवक आणि प्रामुख्याने जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालय प्रभावी जनजागृती व प्रबोधन करत आहेत.
माध्यमिक विद्यालय वाघोशीचे शिक्षक नरेश शेडगे म्हणाले की अनेक सुज्ञ पालक व शिक्षक आपल्या मुलांना दिवाळीत फटाके न फोडण्यास प्रोत्साहित करतांना दिसत आहेत. फटाक्यांच्या दुष्परिणामांची माहिती देत आहेत. फटाके फोडण्याऐवजी मुलांना किल्ले बांधणी, आकाश कंदिल व भेटकार्ड बणविणे, रांगोळी काढणे अशा रचनात्मक उपक्रमात सहभागी करुन घेत आहेत. तसेच फटाक्याचे पैसे वाचवून त्या पैशांत अवांतर वाचनाची पुस्तके विकत घेण्यास मुलांना प्रोत्साहित केले जातांना दिसत आहे.

Exit mobile version