| रायगड | प्रतिनिधी |
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शालेय बस चालकांची पार्श्वभूमी तपासणे, दर आठवड्याला त्यांची मद्यपान व औषध चाचणी करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. शालेय विभागाने जारी केलेले नवीन नियम राज्यातील सर्वच शाळांना लागू करण्यात आले आहेत.
शालेय शिक्षण विभागाने जारी केलेल्या निर्णयानुसार चालक, सफाई कामगार आणि महिला सेविकांची सकाळी व सायंकाळी अशी दोने वेळेस चाचणी होणे गरजेचे आहे. अनधिकृत व्यक्ती बसमध्ये प्रवेश करणार नाहीत. तसेच खाजगी वाहनांमधून येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी चालकाची ओळख व पार्श्वभूमी शाळेला कळवावी, अशी सूचनाही शासन निर्णयामध्ये करण्यात आल्या आहेत. तसेच, पालकांनी चालकांची वैयक्तिक माहिती स्वतःकडे ठेवावी, चालकांची पार्श्वभूमी, तसेच बेपर्वा ड्रायव्हिंग आणि भूतकाळातील अपघाताच्या घटनांचा समावेश असेल. विद्यार्थ्यांसाठी खाजगी वाहतूक व्यवस्थेचा वापर करणाऱ्या पालकांनी शाळा व्यवस्थापनाला चालकाची पडताळणी आणि ओळख तपशीलांची माहिती देणे आवश्यक आहे. बसमध्ये जीपीएस आणि सीसी टीव्ही कॅमेरे बसवणे, दर सहा महिन्यांनी बसची तांत्रिक तपासणी करून आरटीओकडून प्रमाणपत्र घेणे, अशा विविध उपाययोजनांची अमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शाळांनी शौचालये, परिसर आणि इतर संवेदनशील ठिकाणी देखरेख ठेवावी. शाळा सुटल्यानंतर कोणीही विद्यार्थी शाळेत राहणार नाही याची शाळांनी खात्री करावी, अशी सूचनाही करण्यात आली आहे.
शालेय बसमध्ये विद्यार्थ्यांची संख्या आसन क्षमतेपुरतीच मर्यादित ठेवावी. प्रत्येक बसमध्ये एक महिला सेविका अनिवार्य असावी. प्रवासापूर्वी स्कूल बस चालक, क्लीनर आणि महिला सहाय्यकासाठी आठवड्याला मद्यपान व औषध चाचणी अनिवार्य करावी, असेही निर्देश दिले आहेत. रायगड जिल्ह्यात सध्या सुमारे दोन हजार शालेय बस, व्हॅन आणि रिक्षा कार्यरत आहेत. शासन निर्णयाच्या अंमलबजावणीमुळे शाळा व्यवस्थापनाची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. मुख्याध्यापकांची जबाबदारी निश्चित झाली असून, विद्यार्थ्यांच्या वाहतुकीच्या वेळी सुरक्षेची पूर्ण जबाबदारी शाळेवर असणार आहे.
सरकारने सर्व शाळांना एक अलर्ट सिस्टम स्थापित करण्यास सांगितले आहे. जेणेकरून जर एखादा मुलगा शाळेतून हरवला किंवा त्याच्या नियुक्त केलेल्या बसमध्ये चढला नाही तर त्यांना तात्काळ सूचना मिळतील. राज्य सरकारने चालकांची माहिती तपासण्यासाठी जिल्हा समिती नियुक्त करावी. काही चालक इतर राज्यांतील असतात आणि त्यांची पोलीस पडताळणी करणे कठीण असते. आरटीओ आणि पोलिसांनी अशा प्रकरणांमध्ये शाळांना मदत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.