| अलिबाग | प्रतिनिधी |
कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी रायगड जिल्ह्यात पंधरा दिवसांचा जमावबंदी आदेश जिल्हा प्रशासनाने लागू केला आहे. सोमवारी(दि.9) ते सोमवारी (दि. 23) या कालावधीत रात्री बारा वाजेपर्यंत जिल्हा पोलीस कार्यक्षेत्रात अपर जिल्हादंडाधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांनी जमावबंदीचे आदेश दिले आहेत.
खालापूर, महाड, रोहा, खोपोली, रसायनी, माणगाव, अलिबाग अशा औद्योगिक भागांमध्ये कामगार आंदोलन व संपाचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे अनेकवेळा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. जिल्ह्यातील काही भागांमध्ये हिंदू-मुस्लिम तसेच विविध धर्मीयांची मिश्र वस्ती आहे. जातीय तणावाचे प्रसंग घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. महाड येथील किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा 352 वा शिवराज्याभिषेक सोहळा सोमवारी (दि.9)साजरा होणार आहे. लाखो शिवभक्तांची उपस्थिती या दिवशी असणार आहे. तसेच मंगळवारी(दि. 17) व शुक्रवारी (दि.20) राजमाता जिजाऊ स्मृतीदिन साजरा करण्यात येणार आहे. या कालावधीत शस्त्र, लाठ्या, तलवारी, सोटे इत्यादी शारिरीक इजा करण्यायोग्य वस्तू बाळगणे.स्फोटक किंवा ज्वलनशील पदार्थ घेऊन फिरणे. दगडफेक, क्षेपणास्त्रे व त्याची साधने बाळगणे.
प्रतिमा, प्रेत, आकृत्यांचे प्रदर्शन करणे. आक्षेपार्ह घोषणा, गाणी, भाषणे वाजविणे वा सादर करणे. राज्यविरोधी भाषणे, चित्र, चिन्हांचा प्रसार करणे. पाचपेक्षा जास्त व्यक्तींचा जमाव किंवा मिरवणूक पूर्वपरवानगीशिवाय घेणे यावर बंदी ठेवण्यात आली आहे. अंत्यविधी, प्रेतयात्रा, किंवा शासकीय समारंभासाठी ही बंदी शिथील करण्यात आली आहे. यासाठी हा आदेश लागू नाही. उत्सव, सभा, मिरवणूक यासाठी तहसीलदार,कार्यकारी दंडाधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक राहणार आहे. जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन करण्यात येत आहे. कायदा-सुव्यवस्था भंग करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्यात येईल, असे अपर जिल्हादंडाधिकारी संदेश शिर्के यांनी सांगितले आहे.