आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीची यशस्वी चाचणी
| पनवेल | वार्ताहर |
निर्माणाधीन नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीची चाचणी आज यशस्वीरित्या पार पडली आहे. या वेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस या वेळी उपस्थित होते. वायू दलाच्या सी – 295 या विमानाचे विमानतळावर यशस्वीरित्या लँडिंग झाल्यानंतर विमानाला वॉटर सॅल्यूट देण्यात आल्याचे पहायला मिळाले.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन देशांतर्गत विमान सेवा 2025 पासून सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. विमानतळावरील एका धावपट्टीचे काम पूर्ण झाले असून या धावपट्टीवर वायू दलाच्या ताफ्यातील सी 295 विमानाने आकाशात 7 वेळा घिरट्या घातल्यानंतर धावपट्टीवर यशस्वीरित्या लँडिंग केले आहे. या वेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी दरवर्षी 9 कोटी प्रवाशांची वाहतूक विमानतळावरुन होईल अशी माहिती दिली. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्यात चार टर्मिनल असून 42 विमाने उभी राहतील. तसेच विमानतळावर 5500 क्षमतेचे कार पार्किंग असेल. हे विमानतळ 11.04 किलोमिटर परिसरात उभे राहत असून दोन धावपट्या असतील. मुंबई विमानतळाची सध्या 48 दशलक्ष प्रवासी प्रती वर्ष इतकी क्षमता असून वर्ष 2030 पर्यंत मुंबई महानगर प्रदेशातील अपेक्षित असलेल्या 100 दशलक्ष प्रवासी प्रती वर्ष हवाई प्रवास मागणीची पूर्तता करण्यासाठी नागरी विमान चालन मंत्रालयाने नवी मुंबईमध्ये ग्रीनफिल्ड विमानतळ विकसित करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामध्ये रोजगार निर्मितीची मोठी क्षमता आहे. विमानतळ पूर्ण झाल्यानंतर कुशल आणि बिगर कुशल कामगारांसाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. लॉजिस्टिक्स, ट्रेडिंग-फॉरवर्डीग, हॉस्पिटॅलिटी, किंमती वस्तू उत्पादन, बीपीओ इत्यादी क्षेत्रात रोजगार निर्मिती होईल.
लँडिंग महत्वाचे
विमानतळावरील धावपट्टीची तपासणी करण्यासाठी लँडिंग सर्वाधिक महत्त्वाचं असतं. विमान वेगात उतरणं, धावपट्टीने टायर्स पकडून ठेवणं, रेझिस्टन्स आदी गोष्टी याद्वारे तपासल्या जातात. धावपट्टीची तपासणी करण्यासाठी उतरवलेल्या विमानात इतर चाचण्या करणाऱ्या यंत्रणा असतात.
पोलीस कर्मचारी 7 तास ताटकळले
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कार्यक्रमाला येणार म्हणून विमनतळ परिसरात सकाळी सहा पासून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता धावपट्टी पर्यत जाणाऱ्या रस्त्यावर जागोजागी पोलीस कर्मचारी तैनात होते. मुख्यमंत्री आल्या नंतर कार्यक्रम संपे पर्यत तब्बल 7 तास हे कर्मचारी भर उन्हात रस्त्यावर ताटकळले.
