सावंतवाडीत पहिली एसटी दाखल

प्रवाश्यांसह कर्मचार्‍यांच्याही भावना अनावर
न्यायालयाच्या निर्णयानंतर आंदोलनाची दिशा ठरणार
। सिंधुदुर्ग । वृत्तसंस्था ।
राज्यपरिवहन महामंडळ कर्मचार्‍यांनी आरंभिलेल्या संपामुळे जिल्ह्यातील नागरिकांना त्यांची लालपरी साधी नजरेसही पडण्यास दुर्मिळ झाले होते. राज्यशासनाने तोडगा काढल्यानंतर राज्यात बर्‍याच ठिकाणी आंदोलन मावळले असून, यामुळे बर्‍याच दिवसानंतर सावंतवाडीमध्ये पहिली कोल्हापूर-पणजी एसटी आली आणि मार्गस्थही झाली आहे.
अनेक दिवसानंतर झालेल्या या गाठीभेटीत प्रवाश्यांसह कर्मचार्‍यांच्याही भावना अनावर झाल्या आहेत. याशिवाय, हे राज्यशासनात विलनीकरण या मागणीचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने न्यायालयीन निर्णयानंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येणार असल्याचे कामावर रुजू झालेल्य कर्मचार्‍यांकडून सांगण्यात येत आहे. जवळपास 18 दिवसांपासून एसटी कामगारांचे आंदोलन सुरू असल्याने एसटी आगारातच उभ्या आहेत. संप मिटत नसल्याने सरकार, एसटी कर्मचारी यांच्या भांडणात सामान्य नागरिक, व्यापारी, शाळा-कॉलेजचे विद्यार्थी, नोकरदार मात्र भरडले गेले आहेत. याचा परिणाम थेट अर्थचक्रावर झाला आहे. हा संप दिवसेंदिवस चिघळत आहे.
सध्या राज्यातील 250 आगारांतील सेवा ठप्प आहेत. उच्च न्यायालयाचा मनाई आदेशही कामगारांनी धुडकावला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व राज्य परिवहन मंडळाने परोपरीने विनवणी करून, कारवाईचे इशारे देऊनही कामगार माघार घ्यायला तयार नाहीत. कणकवली, कुडाळनंतर ही बस सावंतवाडी आगारात सायंकाळी 4 च्या सुमारास आली. यावेळी या एसटीत 7 ते 8 प्रवासी होते. त्यांनी देखील एसटी सुरु झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. त्यानंतर सावंतवाडीतून पणजीच्या दिशेने ही एसटी मार्गस्थ झाली.

Exit mobile version