काशीद बीचवर बुडणार्‍या पाच पर्यटकांना वाचविले

। मुरूड । वार्ताहर ।

मुरूड तालुक्यातील प्रसिद्ध काशीद बीचवर सोमवारी(दि. 19) सायंकाळी समुद्रात बुडत असणार्‍या पुण्यातील पाच पर्यटकांना मुरूडचे पोलीस कॉन्स्टेबल आणि जीवरक्षकांनी वाचविल्याने फार मोठी दुर्घटना टळली आहे.

गणपती हौसिंग सोसायटी हडपसर, पुणे येथून राजश्री मिश्रा, संजय मिश्रा, आयुषी मिश्रा, बाही मिश्रा, सौम्या मिश्रा असे पाच पर्यटक काशीद बीचवर सोमवारी (दि.19) सायंकाळी 5 वाजता आले होते. पोहण्यासाठी सर्वजण काशीद समुद्रात उतरले असता उसळणार्‍या लाटांनी खोलवर समुद्रात खेचले जाऊन बुडू लागले. किनार्‍यावर जिवाच्या आकांताने आरडाओरडा सुरू झाल्याने क्षणार्धात काशीद बिचवरील ड्युटीवर असणारे पोलिस शिपाई चेतन वेळे, जीवरक्षक राकेश रक्ते, शिवम लाड, सय्यम भोबु, सुयोग महाडिक यांनी जीवाची पर्वा न करता थेट समुद्रात उड्या घेत पोहत जाऊन मानेपर्यंत बुडालेल्या पर्यटकांना वाचवून किनार्‍यावर आणले. जीवाच्या भीतीने घाबरलेल्या या पर्यटकांना पोलीस, जीवरक्षक आणि ग्रामस्थानी धीर दिला.

पावसाळ्यात बंद असणारा पर्यटन क्षेत्रातील प्रसिद्ध काशीद बीच 15 ऑगस्टपासून पर्यटकांसाठी पूर्णपणे खुला करण्यात आला असून बिचवरील सर्व स्टॉल्स सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे पर्यटकांची वर्दळ सुरू झाली आहे. पर्यटकांनी समुद्रात उतरण्यापूर्वी सुरक्षा विषयक माहिती आणि काळजी घ्यावी, खोल पाण्यात जाऊ नये असे आवाहन सरपंच, काशीद ग्रामपंचायत आणि मुरूड पोलिसांनी केले आहे. समुद्रात पाण्याला वेग असतो. शिवाय उसळत्या भरती-ओहोटीच्या लाटांनी आपण काही कळायच्या आत खोल समुद्रात खेचले जाऊ शकतो. समुद्रात पर्यटकांनी बीचवर आनंद जरूर लुटावा, मात्र अतिउत्साहाने खोल समुद्रात जाऊन मस्ती करू नये, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते सूर्यकांत जंगम आणि पर्यटन क्षेत्रातील अनुभवी बुजुर्ग मंडळींनी काशीद येथे मंगळवारी बोलताना केले आहे.

Exit mobile version