। खोपोली । प्रतिनिधी ।
मुबंई-पुणे एक्सप्रेसवेवर शनिवारी (दि. 15) पहाटे सिमेंटच्या बल्कर टँकरचे ब्रेक फेल झाल्याने समोरील दोन टेम्पो, एक ट्रक आणि कार कंटेनर या चार वाहनांना जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मुबंई-पुणे एक्सप्रेसवेवरून पुण्याहून मुंबईकडे सिमेंट बल्कर टँकरचालक हनुमंत कृष्णाप्पा मुनवले (वय 29 रा. सिंदगी बिजापूर कर्नाटक) हा सिमेंट बल्कर टँकर घेऊन जात होता. दरम्यान, बोरघाटात खोपोली एक्सिटजवळील नवीन बोगद्यात आला असता त्याचे ब्रेक फेल झाल्याने त्याने समोरील चालणाऱ्या दोन टेम्पो, एक ट्रक आणि एका कार कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात आयशर टेम्पो हा तिसऱ्या लेनवर पलटी झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, सिमेंट बल्कर टँकरचालकाच्या पायाला किरकोळ दुखापत झाली आहे. या अपघातातनंतर मुबंई-पुणे एक्सप्रेसवेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. मात्र, अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या साहाय्याने बाजूला घेऊन एक्सप्रेसवेवरील वाहतूक सुरळीत करण्यात आली.