ट्रकची दोन दुचाकींना जोरदार धडक
। खोपोली । प्रतिनिधी ।
पाली-खोपोली मार्गावर शुक्रवारी (दि. 14) रात्री एक भीषण अपघात घडला. एका ट्रकने समोरील दोन दुचाकींना जोरदार धडक दिली. या अपघातात एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे.
पाली-खोपोली महामार्गावरून ऋतिक रवींद्र महाडिक (रा. बदलापूर) आपल्या एफझेड दुचाकीवरून तर, स्वप्नील संतोष आमडोस्कर (वय 24, रा. माटुंगा) आपल्या पल्सर दुचाकीवरून पाली बाजूकडून खोपोलीकडे येत होते. दरम्यान, दुरशेत गावाजवळ आले असता खोपोलीकडून पालीकडे जाणाऱ्या ट्रकचालक गुडू कुमार याचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने त्याने समोरील दोन्ही दुचाकींना जोरदार धडक दिली. या धडकेत एफझेड दुचाकीचालक ऋतिक महाडिक याचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा दुचाकीचालक स्वप्नील आमडोस्कर हा गंभीर जखमी झाला असून त्याला तात्काळ एमजीएम रुग्णालय पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.