। छत्रपती संभाजीनगर । प्रतिनिधी ।
छत्रपती संभाजीनगर येथे एका प्रियकराने आपल्या प्रेयसीला शेतात नेऊन तिची हत्या करत मृतदेह पुरल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. तसेच, घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मोनिका सुमित निर्मळ असे हत्या झालेल्या युवतीचे नाव आहे. तर पशेख इरफान शेख पाशा असे हत्या करणाऱ्या प्रियकराचे नाव आहे. जालना येथे राहणारी मोनिका निर्मळ ही महापालिकेच्या आयुष्यमान रुग्णालयात कार्यरत होती. दररोज ती कामानिमित्त संभाजीनगरला ये -जा करायची. तसेच ती रेल्वे स्टेशनवर दुचाकी लावत असे. त्यावेळी तिथे पार्किगवर काम करत असलेल्या शेख इरफान शेख पाशा याच्यासोबत तिची मैत्री झाली होती. त्यानंतर दोघांचे एकमेकांसोबत वर्षभरापासून संबंध जोडले होते. मात्र, 6 फेब्रुवारी रोजी मोनिका ही नियमित रेल्वे स्थानकाजवळ गेली असता, तिथे असलेल्या इरफान याने तिला आपल्या शेतात नेले आणि तिची हत्या केली. हत्येनंतर तिचा मृतदेह शेतातल्या एका पडक्या खोलीत पुरला.
6 फेब्रुवारी रोजी संभाजीनगर येथे ड्युटीवर गेलेली मोनिका रात्री उशिरापर्यंत घरी आली नाही. त्यामुळे आईने पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला असता तपासात आरोपी शेखने त्याच्या शेतात नेऊन मोनिकाची हत्या करून तिचा मृतदेह पुरल्याचे समोर आले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.