तलावातील पाण्यावर बहरली फुलशेती

शेतकऱ्यांना मिळाली नवी दिशा

| चिरनेर | प्रतिनिधी |

पेण तालुक्यातील खारेपाट विभागातील ठाकूरबेडी येथील प्रगतशील कष्टाळू शेतकरी गंगाधर ठाकूर व नागेश ठाकूर यांनी तलावातील पाण्यावर फूलशेती व फळशेती तयार केली असून ती चांगलीच बहरली आहे. त्यांचा आदर्श इतर शेतकऱ्यांनी घ्यावा असे त्यांच्याबद्दल इतर शेतकऱ्यांसह व्यापारी बोलत आहेत. विशेषतः खारेपाट विभागातील पाण्याच्या टंचाईच्या पार्र्श्वभूमीवर एक आशेचा किरण ठरलेली प्रेरणादायी कहाणी समोर आली आहे.

प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत येथील जिद्दी शेतकरी, नागेश ठाकूर, व गंगाधर ठाकूर या ठाकूर बंधूंनी आपल्या कष्टाच्या बळावर फळशेती, फुलशेती, हळद, याचा यशस्वी प्रयोग उभा केला आहे. तलावातील मर्यादित पाण्याचा योग्य आणि शाश्वत वापर करत त्यांनी शेतीत विविध फुलांची, विविध फळांची,लागवड केली आहे. जिथे अनेक शेतकरी पाण्याअभावी हतबल झाले आहेत, तिथे या ठाकूर बंधूंनी योग्य नियोजन, मेहनत आणि नव कल्पना याच्या जोरावर नवसंजीवनी दिली आहे. त्यांच्या शेतात फुललेली रंगीबेरंगी फुले, बहरलेली फळझाडे ही केवळ त्यांच्याच नव्हे तर खारेपाट विभागातील प्रेरणेचे जिवंत उदाहरण आहे. स्थानिक स्तरावर त्यांच्या या प्रयोगाची मोठी चर्चा सुरू असून, याचा इतर शेतकरी याच पद्धतीचे अनुकरण करून प्रयोग करतील अशी आशा वाटते.

गतवर्षी सुद्धा नागेश ठाकूर यांनी मोठ्या प्रमाणावर अशीच शेती केली होती. विशेष म्हणजे अत्यल्प साधन सामुग्री, कमी पाणी, पाण्याचे व्यवस्थापन व योग्य नियोजन या महत्त्वाच्या गोष्टींचा वापर करून त्यांनी ही फळाफुलांची शेती फुलविली आहे. या प्रात्यक्षिकाच्या कृतीतून ठाकूर बंधूंनी हे दाखवून दिले आहे. आज या शेतीमुळे आर्थिक स्थैर्य तर मिळेलच, परंतु शेतकऱ्यांना नवी दिशा मिळेल. खारेपाटच्या कोरड्या जमिनीत आशेची फुले फुलविण्याचा नागेश ठाकूर आणि गंगाधर ठाकूर यांचे काम कौतुकास्पद आहे. प्रशासनाने या प्रयोगशील शेतकऱ्यांचा खरोखर सन्मान केला पाहिजे.असे मत सामाजिक कार्यकर्ते सी.आर. म्हात्रे यांनी व्यक्त केले.

Exit mobile version