बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
सुधागड-पाली | वार्ताहर |
अष्टविनायक तीर्थक्षेत्रापैकी एक असलेल्या पाली शहरात संकष्टी चतुर्थीला रविवारी (ता.21) बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी हजारो भाविक दाखल झाले होते. सकाळपासून दर्शनासाठी भाविकांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे मंदिर परिसराला जणूकाही यात्रेचे स्वरूप आले होते.
रविवारची सुट्टी असल्याने अधिक गर्दी झाली होती. दर्शनासाठी रायगड जिल्हा, महाराष्ट्रातील विविध भागांसह मुंबई, ठाणे, पुणे आदी शहरांतील आणि परराज्यातून भाविक व पर्यटक मोठ्या प्रमाणावर पालीत दाखल झाले होते. वाहनांमुळे काही ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. मात्र, वाहतूक पोलीस व देवस्थान ट्रस्टचे सुरक्षा रक्षक वाहतूक कोंडी सोडवीत होते.
बल्लाळेश्वर मंदिर परिसरात गावठी भाज्या, फळे, काजूगर, कंदमुळे व रानमेवा घेऊन अनेक महिला विक्रेत्या बसल्या होत्या. देवळात येणारे भाविक आवर्जून ते खरेदी करत होते. मंदिर परिसरातील दुकाने व हॉटेल ग्राहकांनी गजबजली होती. परिसरातील हॉटेल, खेळण्यांची व शोभिवंत वस्तुंची दुकाने, नारळ, हार, फुल व पापड मिरगुंड, कडधान्य विक्रेते, प्रसाद व पेढेवाले यांचा व्यवसाय चांगला झाला. मंदिर परिसरात मोठी वर्दळ पहायला मिळत होती. भाविकांच्या सोयीसाठी बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने चोख व्यवस्था करण्यात आली होती.
रविवारची सुट्टी असल्याने संकष्टी चतुर्थीला मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी आले होते. अनेकांनी चांगली खरेदीदेखील केली. व्यवसाय चांगला झाला.
प्रेषित साठे, व्यावसायिक, बल्लाळेश्वर मंदिर
देवस्थान ट्रस्टने विशेष खबरदारी घेत उपाययोजना केल्या आहेत. देवस्थानचे दोन भक्त निवास नाममात्र दरात भाविकांसाठी उपलब्ध केले आहेत. बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने भाविकांच्या सोयीसाठी शुद्ध थंड पाण्याची व सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आली आहे. पार्क करण्यासाठी देवस्थानची दोन भव्य मोफत पार्किंग देखील आहे. तसेच सुसज्ज स्वच्छतागृहदेखील उभारण्यात आले आहेत.
अॅड. धनंजय धारप, अध्यक्ष, बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्ट