शंभर मिनिटे मणिपूरवर अवाक्षरही नाही, विरोधकांचा सभात्याग

मोदींचा प्रतिहल्ला, मणिपूरला काँग्रेसच जबाबदार

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

मणिपूर प्रश्नावर केंद्रातील भाजप सरकारविरुध्द मांडण्यात आलेला अविश्वास प्रस्ताव गुरुवारी अपेक्षेनुसार फेटाळला गेला. त्यापूर्वी तब्बल सव्वादोन तासांच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस पक्षावर तुफान हल्ला चढवला आणि मणिपूरसह ईशान्य भारतातील सर्वच राज्यांतील समस्यांना त्या पक्षाचं आजवरचं राजकारण कारणीभूत आहे असा आरोप केला. विशेष म्हणजे पहिली शंभर मिनिटे त्यांनी मणिपूरच्या विषयाला त्यांनी स्पर्शही केला नाही. ज्यांचे स्वतःचे हात काळे आहेत ते आम्हाला हिशेब मागत आहेत अशी टीका त्यांनी केली. काँग्रेस आणि इंडिया आघाडी ही सत्तेसाठी एकत्र आलेल्या स्वार्थी पक्षांचा जमाव आहे, पण ही आघाडी फार काळ टिकणार नाही असा इशारा त्यांनी दिला. राहुल गांधी हे एक अपयशी उत्पादन असून काँग्रेस पुन्हा पुन्हा त्यांना बाजारात का आणायचा प्रयत्न करीत आहे असा सवाल त्यांनी केला. या हल्ल्‌‍यांमुळे व मणिपूरबाबत मौनामुळे संतप्त विरोधकांनी सभात्याग केला. त्याक्षणी मोदी हे मणिपूरवर बोलू लागले. मणिपूरमध्ये काँग्रेसच्या काळात यादवीसदृश स्थिती कशी होती याची उदाहरणे त्यांनी दिली. तसेच सर्व देश तुमच्या सोबत असून मणिपूर पुन्हा विकास व शांतीच्या मार्गावर परतेल असा विश्वास व्यक्त केला.

अविश्वास ठरावावरील चर्चेला उत्तर देताना मोदींनी काँग्रेससह अन्य घटकपक्षांवरही हल्लाबोल केला. ते म्हणाले काँग्रेसची नीती चांगली नाही, त्यांची नियतही चांगली नाही, देशाच्या जनतेने काँग्रेसवर अविश्वास दाखवला असल्याची टीकाही केली. देशातल्या अनेक राज्यात काँग्रेसला जनतेने नाकारलं असून काँग्रेसकडे स्वतःचं असं काहीच नाही, पक्ष नाही, विचार नाही, चिन्ह नाही, एवढंच काय तर मतांसाठी काँग्रेसने गांधी नावही चोरल्याची टीका पंतप्रधानांनी केली.

मणिपूरचा म ही उच्चारला नाही
मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात सायंकाळी पाच वाजता केली.सुमारे 100 मिनिटाच्या भाषणात त्यांनी राहुल गांधी,काँग्रेसमधील घराणेशाही,इंडियामधील घटक पक्ष यावरच हल्लाबोल केला.मोदींनी मणिपूरवर बोलावे अशी विरोधकांची अपेक्षा होती.पण 1 तास 41 मिनिटांच्या भाषणात त्यांनी मणिपूरच्या घटनेचा साधा उल्लेखही केला नाही.याचा निषेध म्हणून अत्यंत शांतपणे विरोधकांनी सभात्याग केला.विरोधकांची ही कृती मोदींनाही अपेक्षित नव्हती.विरोधक उठून बाहेर जात असतानाच मोदींनी मणिपूरचा उल्लेख आपल्या भाषणातून करीत मणिपूरसह ईशान्येकडील राज्यांबाबत भाष्य केेले.

इंडियामध्ये सगळेच नवरदेव
इंडिया आघाडी नसून घमंडिया आघाडी आहे. तिकडे आता प्रत्येकजण नवरदेव बनू इच्छितो. सगळ्यांनाच पंतप्रधान बनायचं आहे. त्यांनी हा साधा विचार केला नाही की कोणत्या राज्यात कुणाबरोबर तुम्ही कुठे पोहोचला आहात? कुठल्या राज्यात कोणाबरोबर आणि कोणाविरोधात बसला आहात. पश्चिम बंगालमध्ये तुम्ही तृणमूलबरोबर आणि कम्युनिस्ट पक्षाच्या विरोधात आहात. तर दिल्लीत एकत्र आहात.अशी टीकाही त्यांनी केली. रावणाची लंका हनुमानानं नव्हे तर त्यांच्या (रावण आणि त्याची सेना) गर्वानं जाळली. हे सत्य आहे. जनता भगवान रामाच्या रुपात आहे. त्यामुळेच हे (काँग्रेस) 400 वरून 40 झाले (खासदारांची संख्या 400 वरून 40 पर्यंत कमी झाली) आहेत.

मोदी उवाच
विरोधकांना देवाने सुबुद्धी दिली आणि अविश्वास प्रस्ताव आणला, त्यांचा अविश्वास प्रस्ताव म्हणजे आमच्यासाठी शुभ संकेत. 2024 साली आम्ही विक्रमी जागांसह सत्तेत येणार.
विरोधकांनी फिल्डींग आमच्यासाठी सजवली, पण चौके आणि छक्के आमच्याकडून लागले. तिकडून फक्त नो बॉल पडत राहिले. ज्यांचे स्वत:चे हिशोब बिघडलेत ते आमच्याकडून हिशोब मागत आहेत.
गेल्या तीन दिवसांपासून विरोधकांनी माझ्याविरोधात जेवढे काही अपशब्द वापरायचे तेवढे वापरले. पण ते त्यांच्यासाठी चांगलं आहे, कारण त्यांचं मन काहीसं हलकं झालं असेल. मोदी तेरी कब्र खुदेगी हा त्यांच्या आवडता नारा आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांना काही गुप्त वरदान मिळालं आहे, ते लोक ज्यांचं वाईट इच्छितात त्यांचं चांगलंच होतंय. गेल्या नऊ वर्षात माझ्याविरोधात अनेक गोष्टी केल्या, पण माझं चांगलंच झालं.

गेल्या तीन दिवसांपासून या मुद्द्यावर विविध पक्षांच्या नेत्यांनी आपले मत मांडले आहे., विरोधकांनी मात्र याचं गांभीर्य पाळलं नाही. विरोधकांनी जनतेचा विश्वासघात केला असून त्यांना लोकांपेक्षा आपल्या पक्षाची जास्त चिंता आहे. विरोधकांना जनतेच्या भूकेची चिंता नाही, त्यांच्या राजकारणाची चिंता आहे.

नरेंद्र मोदी,पंतप्रधान

अधिरंजन चौधरी निलंबित
लोकसभेत पार पडलेला अविश्वास ठराव आज लोकसभा अध्यक्षांनी फेटाळून लावला आहे. विरोधकांनी वॉकऑऊट केल्यामुळे आवाजी मतदानाने प्रस्तावर फेटाळून लावण्यात आला. तसेच काँग्रेस नेते अधिरंजन चौधरी यांच लोकसभा अध्यक्षांनी निलंबन केलं आहे. एकूणच प्रचंड बहुमत असलेल्या एनडीएचा अविश्वास ठरावात विजय होणार हे निश्चित होतं. विरोधकांनी देखील आम्ही केवळ मोदींनी सभागृहात मणिपूरवर आपली भूमिका स्पष्ट करावी यासाठीच अविश्वास ठराव आणल्याचं सांगण्यात आलं होतं. त्यामुळे विरोधकांच्या इंडिया आघाडीचा उद्देश आज पूर्ण झाल्याचं पाहायला मिळालं. तर एनडीएला देखील बदलेल्या राजकीय परिस्थिती आपल्यामागे किती बहुमत आहे, हे स्पष्ट झालं.

Exit mobile version