| श्रीवर्धन | वार्ताहर |
शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख प्रतोष कोलथरकर व त्यांच्या सहकार्यांनी अखेर शिवसेनेला जय महाराष्ट्र करत शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेतल्यामुळे तालुक्यात शिवसेनेच भवितव्य तालुक्यातील पदाधिकार्यांच्या हाती आहे. सामान्य शिवसैनिक म्हणून संघटनेचे काम करत असताना एक धडाकेबाज नेतृत्व कोलथरकर यांच्या कर्तृत्वात दिसल्यामुळे तालुकाप्रमुख पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली. सहकार्यांचा चांगला पाठिंबा असल्याने पाच वर्षे तालुकाप्रमुख पदाचा योग्य वापर करत तालुक्यातील शिवसेना संघटना वाढवली.
महाविकास आघाडीमधील तत्कालीन नगरविकासमंत्री एकनाथजी शिंदे व रायगड जिल्ह्यातील तीन आमदरांसह इतर आमदारांनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर असलेली आघाडी तोडावी यासाठी आग्रही होते. ही मागणी अमान्य झाल्याने आमदार एकनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थकांसह वेगळा गट स्थापन केला. तेव्हापासून श्रीवर्धन तालुक्यात शिवसैनिकांची अवस्था ‘विठ्ठला, कोणता झेंडा घेऊ हाती’ अशी झाली आहे. तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक जरी आम्ही पक्षप्रमुखांच्या पाठीशी आहोत असे म्हणत असले, तरीही शिवसैनिक अद्यापही द्विधा मनःस्थितीत आहेत.