महाविकास आघाडीचा जल्लोष
शिंदे गटाची आगपाखड
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीत आज छाननीमध्ये शिंदे गटाकडून दाखल करण्यात आलेल्या सातपैकी चार अर्ज बाद झाल्याने आता फक्त तीनच जागांसाठी निवडणूक होणार असून महाविकास आघाडीचे 15 उमेदवारांचा विजय निश्चित झाला आहे. शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखाला अर्जदेखील व्यवस्थीत दाखल न करता आल्याने त्यांच्यासह चार अर्ज बाद ठरले. निम्म्याहून अधिक उमेदवारी अर्ज बाद झाल्याने आगपाखड करीत बंडखोर आमदार महेंद्र दळवी यांनी हरकत घेत सरकारी निरीक्षकांसोबत पडताळणी करण्याची मागणी केली.
मात्र अर्जासोबत असलेले शेतकरी दाखले, आर्थिक दुर्बल प्रमाणपत्र नसल्याने सदर अर्ज तांत्रिक दृष्टया बाद करण्यात आले. दरम्यान अलिबागसह मुुरुड आणि रोहा अशा अलिबाग विधानसभा मतदारसंघातील तीनही तालुक्यात महाविकास आघाडीच्या सहकार्याने शेकापक्षाचे वर्चस्व कायम राहिले आहे. शेतकरी भवन येथे माजी आमदार पंडित पाटील यांनी विजयी उमेदवारांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी जोरदार फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.
बुधवारी अर्जांची छाननी करण्यात आली. यावेळी शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख राजा केणी यांच्यासह प्रियांका घातकी, शैलेंद्र पाटील आणि सागर पाटील यांचे अर्ज अवैध ठरले. त्यामुळे आता उर्वरित तीन अर्ज कायम असल्याने या मतदार संघात निवडणूक होणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी अशोक मोरे यांनी सांगितले. आतापर्यंत बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये प्रमोद ठाकूर सहकारी संस्था, गजानन झोरे, संध्या पाटील, अशुप्रिता वेळे, सलीम तांडेल, भास्कर भोपी, अर्चना हंबीर, मुकेश नाईक यांचा समावेश आहे.
आता 6 एप्रिल रोजी अंतिम उमेदवारांची यादी प्रसिध्द केली जाईल. तसेच 11 ते 3 च्या दरम्यात उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ असेल. अंतिम यादी प्रसिध्दी 21 एप्रिल 2023 रोजी करण्यात येईल. निशाणीचे वाटप देखील त्याच दिवशी करण्यात येईल. मतदान 30 एप्रिल 2023 रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 पर्यत. मतमोजणी त्याच दिवशी संध्याकाळी करण्यात येणार आहे.