विरेंद्र सेहवागने व्यक्त केला अंदाज
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
यंदाची एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा भारतात रंगणार आहे. या विश्वचषक स्पर्धेची सुरूवात 5 ऑक्टोबरला होणार आहे. 2011 नंतर तब्बल 12 वर्ष भारताला कोणतेही आयसीसीचे विश्वविजेतेपद जिंकता आलेले नाही. त्यामुळे भारतीय संघाला आपल्या भूमीवर स्पर्धा जिंकून दुष्काळ संपवण्याची ही चांगली संधी मानली जात आहे. तशातच माजी भारतीय क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग याने या स्पर्धेत भारतासह इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान उपांत्य फेरीतपर्यंत मजल मारतील, असा अंदाज वर्तवला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारत अलिकडच्या वर्षांत क्रिकेटमधील दमदार संघ म्हणून उदयास आला आहे. स्फोटक फलंदाजी आणि समतोल गोलंदाजी आक्रमणाच्या सामर्थ्याने भारत विश्वचषकात वर्चस्व गाजवण्याच्या तयारीत आहे. त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड आणि सातत्यपूर्ण कामगिरीमुळे भारतीय संघ उपांत्य फेरीत स्थान निश्चित करण्यासाठी प्रबळ दावेदार मानली जात आहे.
गतविजेता इंग्लंड आशियाई परिस्थितीत आपले विजेतेपद राखण्यासाठी कटिबद्ध आहे. गतिमान क्रिकेट आणि आक्रमक शैली अशी सध्याच्या इंग्लंडच्या संघाची ओळख आहे. इंग्लंडची फलंदाजी त्यांच्या जमेची बाजू ठरते. मोठ्या लक्ष्यांचा पाठलाग करण्याची त्यांची क्षमता आणि दडपणाखाली चांगली कामगिरी करण्याची जिद्द यामुळे ते टॉप 4 मध्ये येऊ शकतात. आयसीसीच्या स्पर्धांमधील सातत्यपूर्ण कामगिरी करणारा संघ म्हणजे ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलियन संघाला विजेतेपदाचा इतिहास तर आहेच, पण त्यासोबतच त्यांनी आतापर्यंत अनेक चांगले खेळाडूही घडवले आहेत. विश्वचषक स्पर्धेमध्ये त्यांचे दमदार प्रदर्शन करणे अपेक्षित आहे. ऑस्ट्रेलियन संघात फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हीचे चांगले मिश्रण आहे. प्रमुख स्पर्धांमध्ये त्यांचा सातत्यपूर्ण ट्रॅक रेकॉर्ड आणि दबावाखाली कामगिरी करण्याची हातोटी त्यांना उपांत्य फेरीसाठी प्रबळ दावेदार बनवते. कायम अंडरडॉग मानल्या जाणाऱ्या पाकिस्तानला यंदा भारतात क्रिकेटचे सामने खेळायचे आहेत. 2009 नंतर भारताच्या भूमिवर पाकिस्तानचा संघ फारसा क्रिकेट खेळलेला नाही. तशातच भारत-पाकिस्तान यांच्यातील राजकीय कलह पाहता पाकचा संघ ही संधी सध्या तरी सोडणार नाही. आयसीसीच्या स्पर्धांमध्ये पाकिस्तानची सातत्यपूर्ण कामगिरी त्यांच्यासाठी नक्कीच फायद्याची ठरू शकते.