| नेरळ | वार्ताहर |
बदलापूर येथून आलेल्या चार वर्षीय मुलाचा स्विमिंग पूलमध्ये पडून मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. आयांश अभिजित निवाळकर असे त्याचे नाव आहे. तो आपल्या आई सोबत फिरण्यासाठी म्हणून नेरळ येथे आला होता. सोमवारी (दि.3) सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास आयांश हा आपल्या आईचे लक्ष चुकवून स्विमिंग पुलजवळ गेला असता त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. नेरळ पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर पुढील तपास हा नेरळ पोलीस करीत आहेत.
बदलापूर वेस्ट जवळील शनिमंदिर परिसरातील मनोहर निवास इमारतीत राहणारे निवाळकर हे चार वर्षीय आयांश मुलगा आणि आई असे फिरण्यासाठी आपल्या मैत्रिणींसोबत शनिवारी (दि.1) रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास नेरळ येथे आले होते. निवाळकर आणि त्यांच्या मैत्रिणी ह्या नेरळ जवळील कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीतील आशीर्वाद व्हीला या फार्महाऊसवरील बंगल्यात वस्तीला राहिले होते. त्यांच्या सोबत त्यांची लहान मुले देखील होती. सर्व पाच महिला आणि एक व्यक्ती त्याच सोबत लहान पाच मुले असा हा ग्रुप होता. दुपारचे जेवण करून ह्या महिला बंगल्याच्या टेरेसवर गप्पागोष्टी करण्यासाठी बसले असताना, लहान मुले बाजूला खेळत होती. यावेळी निवाळकर यांचा आयांश निवाळकर हा लहान चिमुरडा आईची नजर चुकवत बंगल्यामध्ये असणाऱ्या स्विमिंग पूल जवळ गेला असता, तो पाण्यात पडला.
ही घटना सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडली होती. 15 मिनिटे हा मुलगा पाण्यात पडून होता. मुलगा कुठे दिसून येत नसल्याने निवाळकर ह्या मुलाचा शोध घेत होत्या. दरम्यान मुलगा हा स्विमिंग पुलच्या पाण्यात पडल्याचे दिसून आल्याने आईने एकच टाहो फोडला. चार वर्षीय मुलाला नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता, पाण्यात बुडाल्याने मुलाचा गुदमरून मृत्यू झाल्याचे नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रातील उपस्थित डॉक्टरांनी यावेळी सांगितले. निवाळकर कुटुंबात 9 वर्षान मुलगा जन्माला आला होता अशी माहिती देखील समोर आलेली आहे. यावेळी नेरळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. नेरळ पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.