। पेण । वार्ताहर ।
खरीप हंगामात अत्याधुनिक कृषी तंत्रज्ञानावर भर देण्यात आला आहे. खते व बियाण्यांची थेट बाजारपेठेतून खरेदी करण्याची मुभा शेतकर्यांना असल्याने फसवणुकीची शक्यता आहे. त्यामुळे खतांची साठेबाजी, एमआरपीनुसार विक्री बंधनकारक असून त्याचे उल्लंघन करणार्या दुकानांचे परवाने रद्द करण्याचे आदेश तालुका कृषी अधिकारी ए.आर.रोकडे यांनी दिले आहेत.
खरीप हंगामपूर्व तयारी म्हणून जिल्हा परिषद कृषी विभागाने शेतकरी बांधवांना टंचाई भासू नये यासाठी जिल्ह्यातील 196 कृषी सेवा बियाणे केंद्रात बियाणे विक्री तर 265 कृषी सेवा केंद्रात खतांची विक्री केली जात आहे. यासाठी बाजाराच्या मागणीनुसार 20 हजार 20 मेट्रिक टनाची विक्री अपेक्षित धरून 27 हजार मेट्रिक टन खताची मागणी जिल्हा कृषी विभागाने नोंदविली आहे. तर एक हजार 721, 24 मेट्रीक टन विक्रीसाठी उपलब्ध आहे.
प्रत्येक कृषी अधिकार्यांस खते, बियाणे व कीटकनाशकांच्या तपासणीचे उद्दीष्ट दिले आहे. त्यांनी बाजारपेठेत जाऊन नमुने गोळा करायचे आहेत. त्यानंतर या नमुन्यांची तपासणी केली जाणार आहे. या तपासणीसाठी प्रत्येक तालुक्यात भरारी पथके तयार केली गेली आहेत. या पथकांद्वारे कृषी सेवा केंद्राची तपासणी करून तेथील बियाणे व खतांचे नमुन्यांसोबत दुकानाच्या कागदपत्राचीही तपासणी होणार असल्याची माहिती कृषी अधिकारी रोकडे यांनी आमच्या वार्ताहारांशी बोलताना सांगितले.
पेण तालुक्यात 22 बियाणे केंद्रे तर पंधरा खत केंद्र असून यांच्यावर कृषी विभागाने पारित केलेल्या निकषानुसार खत-विक्री केंद्रावर खताच एमआरपीनुसार दरपत्रक लावण्यात आले आहेत. शेतकर्यांची फसवणूक होणार नाही. याची दक्षता पेण तालुका कृषी विभागामार्फत घेतली जाणार आहे. आमच्या खात्या मार्फत पूर्ण लक्ष ठेवलेला आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारची आपराथपड अगर शेतकर्यांची फसवणूक केल्यास दुकानदारांना आपल्या परवान्यापासून हात धुऊन बसावे लागेल.
रोकडे, माहिती कृषी अधिकारी