नोकरीच्या बहाण्याने लाखोंची फसवणूक

| नवीन पनवेल | प्रतिनिधी |

सरकारी बँकेत नोकरीला लावतो असे सांगून दोघांनी 31 लाख 17 हजार रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी छत्तरसिंग सुखलाल राजपूत यांना पनवेल शहर पोलिसांनी अटक केली आहे. यातील आणखी एक साथीदार अनिल कचरे हा फरार असून, त्याचा शोध पोलीस घेत आहेत.

करंजाडे येथे राहणारे ग्रामसेवक परमेश्वर जाधव यांच्या मुलीला सरकारी बँकेत नोकरी लावून देतो असे सांगून छत्तरसिंग सुखलाल राजपूत (55) आणि अनिल कचरे यांनी 2023 पासून जाधव यांच्याकडून 31 लाख 17 हजार रुपये घेतले. यावेळी त्यांच्या मुलीला बँक ऑफ बडोद्याच्या शाखेत कामावर पाठवण्यात आले. मात्र, तिला शासनाकडून पगार येत नव्हता. खासगी पगार येत असल्याने त्याची विचारणा जाधव यांनी राजपूत यांच्याकडे केली. तसेच, तिला बँक ऑफ बडोदाचे बनावट अपॉइंटमेंट लेटर देखील देण्यात आले होते. याबाबत परमेश्वर जाधव यांनी राजपूत यांच्याकडे शासकीय नोकरी लावण्यासाठी घेतलेल्या पैशांची विचारणा केली. यावेळी राजपूत यांनी टाळाटाळ केली. त्यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क देखील होत नव्हता. फसवणूक झाल्याचे जाधव यांच्या लक्षात आल्याने त्यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पनवेल शहर पोलीसांनी सत्तरसिंग राजपूत याला वसई येथून ताब्यात घेऊन अटक केली. याप्रकरणी पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे.

Exit mobile version