। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल तालुक्यातील बारवई, ठोंबरेवाडी परिसरात रानगवा मुक्तसंचार करत आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने या रानगव्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात आहे.
पनवेल तालुक्यात पूर्वी मोठ्या प्रमाणात जंगल होते, मात्र हे जंगल नामशेष होत चाललेले आहे. त्यामुळे वन्यजीव मानवी वस्तीत प्रवेश करत आहेत. यापूर्वीदेखील वन्यजीव मानवीवस्तीत प्रवेश करत असल्याच्या घटना घडल्या आहेत. नष्ट होणार्या जंगलामुळे वन्यजीवांचे अधिवास धोक्यात आले आहे. अनेक ठिकाणी इमारतींची कामे सुरू असल्याने वन्यजीवांचा अधिवास धोक्यात आला आहे. त्यामुळे बिबटे, वाघ, रानगवा, कोल्हे मानवी वस्तीत येऊ लागले आहेत. खारघरमध्ये अनेक वेळा सोनेरी कोल्ह्याचे दर्शन झाले आहे. तर काही ठिकाणी बिबट्याचा वावरदेखील दिसून आला आहे. या रानगव्याच्या गळ्यात एक दोर अडकला असून त्याद्वारे त्याला पकडण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहन वनविभागातर्फे करण्यात आले आहे.