शाळांना येऊ लागले व्यावसायिक स्वरूप; जाहिरातींच्या माध्यमातून वेगवेगळी प्रलोभने
। महाड । वार्ताहर ।
नवीन शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेत प्रवेश घ्यावा, यासाठी शैक्षणिक संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात चुरस लागल्याचे चित्र सध्या दिसत आहे. अनेक शैक्षणिक संस्थांनी जाहिरातींच्या माध्यमातून तसेच वेगवेगळी प्रलोभने दाखवून विद्यार्थ्यांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. काही वर्षांपासून विद्यामंदिर व ज्ञानमंदिर म्हणून ओळखल्या जाणार्या शाळांना आता व्यावसायिक स्वरूप येऊ लागल्याने शैक्षणिक संस्थांमध्येदेखील मोठ्या प्रमाणात चढाओढ पाहावयास मिळत आहे.
बदलत्या काळानुसार शिक्षण क्षेत्रातही बदल होत आहे. नवनवीन बदल स्वीकारत शाळा व्यवस्थापनाचे आपल्या शाळांची पटसंख्या वाढवण्यासाठी सध्या मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये खासगी शाळांबरोबरच जिल्हा परिषदेच्या शाळांचादेखील सहभाग दिसत आहे. आपल्या शाळेमध्ये जास्तीत जास्त प्रवेश नोंदणी कशी करता येईल, यासाठी शाळा व्यवस्थापनांकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत.
शाळेमध्ये दिल्या जाणार्या विविध सोयीसुविधा, शाळांमध्ये राबवले जाणारे उपक्रम, मार्गदर्शन वर्ग तसेच यशस्वी विद्यार्थ्यांची छायाचित्रांसह माहिती अशा मोठ्या जाहिराती व फलक शैक्षणिक संस्थांकडून लावले जात आहेत. यात सीबीएससी बोर्ड, शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये चमकणारे विद्यार्थी, सीए फाउंडेशन कोर्स, जेईई व नीटची तयारी, अशी प्रलोभने पालकांना दाखवून विद्यार्थ्यांना आपल्याकडे ओढण्याचा मार्ग शैक्षणिक संस्था अवलंबताना दिसत आहेत.रायगड जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी शैक्षणिक संस्थांचे बॅनर लावले आहेत, तर वृत्तपत्रातून जाहिरात पत्रकेदेखील वाटली जात आहेत.
काही शाळांनी शिबिरे भरविण्यासदेखील सुरुवात केली आहे. आपली शाळा इतर शाळांपेक्षा कशी सरस आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न शाळा व्यवस्थापनांकडून सुरू आहे. त्यातच पालकांकडूनदेखील मुलांना नामांकित शाळेत प्रवेश देण्याची बाब प्रतिष्ठेची केली जात आहे. त्यामुळे अनेक शाळांनी आपले शुल्कदेखील वाढवले आहे, परंतु एका बाजूला शाळांची वाढलेली फी तर दुसरीकडे शाळांची शैक्षणिक गुणवत्ता यांची सांगड घालत पालकवर्ग आपल्या पाल्याचा प्रवेश कोणत्या शाळेत घ्यावा, या विचारात पडला आहे.
पटसंख्या वाढवण्यावर भर
जिल्हा परिषद शाळांमध्येदेखील विद्यार्थ्यांची पटसंख्या घसरत आहे. त्यामुळे जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा याकरिता जिल्हा परिषद व सरकारी शाळादेखील आपला प्रचार करण्यात मागे नाहीत. सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना असणार्या सोयीसुविधा, पोषण आहार मोफत गणवेश, मोफत पाठ्यपुस्तके व शिक्षण यावर भर देत सरकारी शाळादेखील प्रवेश नोंदणीबाबत आग्रही असल्याचे दिसत आहे. जिल्ह्यातील काही नामांकित शाळांनी ग्रुप फ्रीमध्ये सवलत, तर माऊथ पब्लिसिटी हा नवीन फंडादेखील अवलंबला आहे.