वर्षभरात हजारो रुग्णांनी घेतला लाभ; टेलीमेडिसीन बनतोय रुग्णांचा आधार
। माणगाव । प्रतिनिधी ।
माणगाव तालुक्याचा विस्तार मोठा असून सर्व सामान्य जनतेला नेहमीच औषध उपचारासाठी माणगावातील उपजिल्हा रुग्णालयात यावे लागते. वैद्यकीय क्षेत्राला लाभलेल्या आधुनिक तंत्राच्या पाठबळामुळे टेलिमेडीसीन पद्धत रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात प्रभावी ठरत असून, दुर्गम भागातील रुग्णांसाठी देखील ही पद्धत संजीवनी ठरत आहे. गंभीर आजार असलेल्या रुग्णांची माहिती संकलित करून उपचाराची दिशा ठरविली जात असल्याने रुग्ण दगावण्याचे प्रमाण कमी झाले आहे. या उपजिल्हा रुग्णालयामध्ये टेलीमेडिसीन ही सेवा विनामूल्य उपलब्ध असून एप्रिल 2023 ते डिसेंबर 2024 पर्यंत 1 हजार 033 रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला आहे.
माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात टेलीमेडिसीन केंद्रातून रुग्णांवर उपचार होत आहेत. टेलिफोन व इंटरनेटच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टरांकडून आरोग्यविषयक सल्ला दिला जातो. यात इंटरनेट अथवा अन्य माध्यमांद्वारे वैद्यकीय माहितीचे आदान-प्रदान केले जाते. वैद्यकीय सल्ल्यासाठी व दुर्गम भागातील रुग्णांचे रोगनिदान करण्यासाठी या सुविधेचा उपयोग होत आहे. टेलीमेडिसीन पद्धतीत टेलिफोन इंटरनेट अथवा उपग्रह संपर्काच्या माध्यमातून व्हिडीओ कॉन्फरिन्संगद्वारे एका ठिकाणी बसलेले आरोग्य विशेषज्ज्ञ दुसर्या ठिकाणच्या रुग्णांसह तज्ञांना ऑनलाइन सल्ला देतात. याद्वारे रुग्णांची माहिती पाठवून रुग्णांना तज्ञांचे मत व सल्ला मोफत दिला जातो. या पद्धतीद्वारे मिळणारे उपचार लाभदायक ठरत आहेत. त्यामुळे रुग्णांच्या पैशांची व वेळेची बचत होते.
सर्व रुग्णालये कक्षेत
राज्यातील मेडिकल कॉलेज, जिल्हा व निवडलेले उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय येथे टेलीमेडिसीन स्थापना केली आहे. उपलब्ध स्पेशालीस्ट हॉस्पिटल के. इ. एम. हॉस्पिटल मुंबई, नानावटी हॉस्पिटल मुंबई, सायन हॉस्पिटल मुंबई, बीजेएमसी पुणे, जीएमसी औरंगाबाद, नागपूर व जे.जे. हॉस्पिटल, जिल्हा रुग्णालय अलिबाग या ठिकाणाहून तज्ञ डॉ चा सल्ला उपलब्ध होत असल्याने ते हब म्हणून कार्यरत आहेत. तसेच डीएच, एस डी एच व आर एच , प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र हे स्पोक म्हणुन ओळखले जाते. त्यानुसार त्यांचे कार्य विभागले जाते.*
टेलीमेडिसीनमधून दिली जाणारी रुग्ण सेवा ही माणगाव तालुक्यातील तसेच ग्रामीण भागातील जनतेला लाभदायक ठरत आहे. तसेच, गरजू रुग्णांनी माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयाशी टेलीमेडीसीन विभागास संपर्क साधावा. तसेच, आता ई- संजीवनी ओपीडीमार्फत प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रातील रुग्णांना देखील अशा सेवेचा लाभ आमच्या मार्फत देण्यात येत आहे.
अन्वीता गोरेगावकर,
टेलीमेडिसीन फॅसिलिटी मॅनेजर