। माणगाव । प्रतिनिधी ।
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना 2.0 अंतर्गत माणगाव तालुक्यात पन्हळघर खुर्द, वडगाव, वडवली, कामशेत, नगरोली, निळज, कांदळगाव बु., करंबेळी या गावात पाणलोट रथयात्रेचे आयोजन करण्या आले आहे. ही यात्रा 5 ते 10 फेब्रुवारी दरम्यान चालणार आहे.
यात प्रकल्प क्षेत्रातील स्थानिक नागरिकांना मोबाईल थिएटर द्वारे पाणलोट कामांबाबत आभासी सहलीचा अनुभव येणार आहे. त्याकरीता केंद्र शासनाकडून पाणलोट मोबाईल थिएटर व्हॅन येणार आहे. पाणलोट क्षेत्रात फळबाग लागवड करणे, पाणलोट क्षेत्रावर श्रमदान करणे, पूर्ण झालेल्या कामांचे लोकार्पण करणे, कामांचे भूमीपूजन करणे, पाणलोट क्षेत्रात जे कामे पूर्ण झाले आहेत ती कामे स्थानिक शाळांना प्रोत्साहन देणे आदी उपक्रम यात्रेच्या माध्यमातून राबवले जाणार आहेत.
पाणलोट यात्रा सुरू होण्याअगोदर तालुक्यात ग्रामसभेचे आयोजन करून समाजमाध्यमांत प्रचार प्रसिद्धी केली जाणार आहे. उत्कृष्ट काम करणार्या पाणलोट समिती सदस्य, कर्मचारी व नागरिकांची पाणलोट योध्दा म्हणून निवड करणार आहे. गावात प्रभात फेरी, शाळांमध्ये निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. पाणलोट यात्रा सुरू होण्यापूर्वी पाणलोट योध्दा व धरणीताईची निवड होणार आहे. पाणलोट यात्रेसाठी जलसंधारण विभाग, वन विभाग व कृषि विभागाने पर्व तयारी सुरु केली आहे.