अधिकार्यांवर कारवाईची मागणी
। नवीन पनवेल । प्रतिनिधी ।
सरकारी काम आणि बारा महिने थांब ही म्हण पनवेल तालुक्यातील पुरवठा विभागात लागू पडते. गेल्या साडेपाच महिन्यानंतर देखील येथील आदिवासी बांधवांना विभक्त रेशन कार्ड मिळत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. माहितीच्या अधिकारात माहिती मागून देखील रेशन कार्डबाबत माहिती देण्यात आलेली नाही.
देहरंग येथील कल्पना पारधी, वर्षा पारधी, चंपा पारधी यांनी सेतू कार्यालयमध्ये ऑगस्ट 2024 रोजी विभक्त रेशन कार्डसाठी अर्ज केला होता. मात्र, साडेपाच महिन्यानंतर देखील त्यांना रेशन कार्ड उपलब्ध झाले नाही. जुने रेशन कार्ड पुरवठा विभागात जमा करण्यात आल्याने त्यांना धान्य देखील मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. नवीन विभक्त कार्डाबद्दल पुरवठा अधिकार्यांशी बोलले असता त्यांनी देखील व्यवस्थित माहिती दिली नाही, असे पारधी यांनी सांगितले. अंदाजे 15 ते 20 दिवसांमध्ये विभक्त रेशन कार्ड मिळायला हवे होते. मात्र, तब्बल 200 दिवस होत आले तरी देखील कार्ड मिळाले नाही.
याबाबत रमेश भस्मा यांनी माहितीच्या अधिकाराअंतर्गत रेशनकार्डच्या अर्जावर करण्यात आलेल्या कार्यवाहीचा प्रति मिळाव्या त्यासाठी अर्ज केला. मात्र, 50 दिवस होऊन गेले तरी देखील त्याची माहिती मिळाली नाही. त्यानंतर त्यांनी अपिलीय अधिकारी तहसील कार्यालय यांच्याकडे अर्ज केला. त्याला देखील 21 दिवस उलटून गेले त्याला देखील कोणताही प्रतिसाद देण्यात आलेला नाही. यावरून पुरवठा विभाग आणि तहसील कार्यालयात सुरू असलेला अनागोंदी कारभार समोर आला आहे. त्यामुळे अधिकार्यांवर कारवाई करण्याची मागणी या आदिवासी बांधवांकडून करण्यात येत आहे.