महसूल विभागाचे दुर्लक्ष; तात्पुरत्या कारवाईची नोटीस
। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील रेल्वे पट्ट्यात बांधण्यात आलेले पाली भूतीवली येथील लघुपाटबंधारे धरणाच्या बांधाजवळ खोदकाम सुरु आहे. या खोदकामासाठी दररोज जेसीबी तसेच प्रोक्लेम मशीन आणि बुलडोझर वापरले जात आहेत. मात्र, ते खोदकाम करताना महसूल विभागाकडे गौण खनिज उत्खनन करण्यासाठी कोणत्याही स्वरूपातील स्वामित्व शुल्क म्हणजेच रॉयल्टी भरलेली नाही. गेली काही महिने सातत्याने दिवसरात्र उत्खनन केले जात असून महसूल विभागाचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, त्या ठिकाणी शेतकर्यांनी आवाज उठवल्यावर महसूल विभागाने तात्पुरती कारवाई करत अनधिकृत खोदकाम करणार्या सेप्टगॉन व्हेंचर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला दंडात्मक कारवाई करण्याची नोटीस बजावली आहे.
महाराष्ट्र सरकारने 200 हुन अधिक कोटी खर्च केलेल्या पाली भूतीवली लघुपाटबंधारे धरणाच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात खोदकाम सुरु आहे. तेथे गेली काही महिने सतत डोंगर फोडून माती उत्खनन केले जात आहे. त्यात त्या ठिकाणी माती उत्खनन करण्यासाठी आणि काही दगड फोडण्यासाठी सुरुंग स्फोट देखील केले जात असून त्याबाबत कोणत्याही प्रकारची परवानगी घेतली नसल्याचे आढळून आले आहे. माती उत्खनन करताना संबंधित सेप्टगॉन व्हेंचर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून कोणत्याही प्रकारचे स्वामित्व शुल्क भरलेले नाही. त्यात धोकादायक बाब म्हणजे पाली भूतीवली धरणाचा मुख्य भाग असलेल्या ठिकाणापासून जेमतेम 50 मीटर अंतरावर हे खोदकाम सुरु आहे. मात्र, असे असताना पाटबंधारे विभाग केवळ खोदकाम थांबवण्याची नोटिसा बजावत आहे. तर, कर्जत तहसील कार्यालय तेथे सुरु असलेल्या उत्खननावर करवाई करताना दिसत नाही.
या भागातील महसूल मंडळाकडून तहसील कार्यलायाला केवळ सूचना देण्यात आली आहे. मात्र, तहसील कार्यालयाने सुरु असलेल्या उत्खननाची नोंद घेतली नाही आणि त्या बेकायदा केल्या जात असलेल्या उत्खनावर कोणत्याही प्रकारची कारवाई करताना देखील दिसत नाही. महसूल विभागाने मागील वर्षभर तेथे खोदकाम सुरु असताना देखील त्या ठिकाणी काहीच सुरु नाही, अशी भूमिका घेऊन दुर्लक्ष केले जात आहे.
10 हजार ब्रासचे उत्खनन सेप्टगॉन व्हेंचर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने बेकायदा माती उत्खनन केल्याबद्दल बजावलेल्या नोटीसीमध्ये 755 ब्रास मातीचे उत्खनन केले असल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र, महसूल विभागाने तेथे बिना परवाना खोदकाम झालेल्या ठिकाणी 765.90 चौरस घन मीटरमध्ये केल्या गेलेल्या उत्खननावर केवळ 755 ब्रास माती आणि 55 ब्रास दगड खोदकाम केल्याबद्दल दंड आकारण्यात आला आहे. परंतु, तेथे 10 हजार ब्रास मातीचे उत्खनन केले गेल्याचा दावा स्थानिक शेतकरी करीत आहेत.
आम्ही स्थळ पाहणी करून संबंधित बिल्डरकडून करण्यात आलेल्या उत्खननाबद्दल पंचनामा केला आहे. मंडळ अधिकार्यांकडून आलेल्या अहवालानंतर आमच्या कार्यालयाने संबंधित माती उत्खननाबद्दल नोटीस बजावली आहे. त्यांनी सात दिवसांत दंड भरला नाही किंवा दंडाबाबत संबंधित कंपनीचे काहीही म्हणणे आले नाही तर आमचे कार्यालय पुढील कारवाई सुरु करणार आहे.
डॉ. धनंजय जाधव,
तहसीलदार, कर्जत