दलित हातरिक्षा सदस्यांची आर्त साद
। माथेरान । वार्ताहर ।
नोकरी-धंदा नसल्यामुळे आजवर आम्ही नाईलाजाने हातरीक्षा सारख्या अमानवीय प्रथांचा अवलंब करून कुटुंबातील सदस्यांना आधार देत आहोत. अनेक वर्षांपासून अशाप्रकारे कष्टदायक कामे करून आमची श्रमिक मंडळी अर्ध्या आयुष्यात स्वर्गवासी झाली आहेत. आमच्या माथी सुद्धा भविष्यात काय वाढून ठेवले आहे माहीत नाही. परंतु, या ई-रिक्षांसंदर्भात सर्व प्रकारची पायलेट प्रोजेक्टची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होऊन सुप्रीम कोर्टाने निर्देश दिलेले असताना सुद्धा सनियंत्रण समितीच्या पदाधिकार्यांना आमच्या हिता बाबतीत काहीएक स्वारस्य दिसत नाही. एकूण 94 परवाना असणार्या हातरीक्षांच्या जागी केवळ 20 ई-रिक्षा देण्यात आल्या आहेत. परंतु, सद्यस्थितीत ज्या उर्वरित 74 हातरीक्षा आहेत त्यांच्या बदल्यात ई-रिक्षा मिळालेल्या नाहीत. यामध्ये सनियंत्रण समितीच्या पदाधिकार्यांनी चालढकल करू नये, अन्यथा आम्हाला तीव्र आंदोलन करावे लागेल. अशी आर्त साद दलित समाजातील श्रमिक हातरीक्षांच्या सदस्यांनी दिली आहे.
नगरपालिकेत चतुर्थ श्रेणीच्या अवघ्या 29 जागा असून त्याठिकाणी वारसा हक्काने भरती केली जाते. आमची माणसे सुद्धा हातरीक्षांच्या व्यवसायात अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यामुळे आम्हाला सुद्धा आमच्या हक्काच्या ई-रिक्षा मिळायला पाहिजेत. किती वर्षे आम्ही शौचालयाच्या घाणीचे काम करून जीवन जगायचे, आम्हाला सुद्धा भावना आहेत. मुलांचे शिक्षण, लग्नकार्य यासाठी ई-रिक्षाच्या माध्यमातून एक उत्तम रोजगाराची संधी चालून आलेली आहे. तिच्यापासून आम्हाला दूर करू नका.
संतोष लखन,
हातरीक्षा सदस्य, माथेरान