नागरिक उतरले रस्त्यावर
। पनवेल । प्रतिनिधी ।
कळंबोली उपनगरात सोमवारी (दि.8) रात्री वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिकांना उकाड्यात रात्र जागून काढावी लागली. रात्री अनेक वेळा वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर सव्वा अकराच्या सुमारास वीजपुरवठ्याचा एक प्रवाह बंद पडल्याने उपनगरातील मोठा भाग अंधारात गेला. संतप्त नागरिकांनी रात्रीच महावितरणच्या उपकेंद्रात धाव घेतली. कामोठ्यातील वीजप्रश्न सोडविण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष दिले असताना कळंबोलीत मात्र विजेचा लपंडाव सुरू राहिल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
कळंबोली उपनगरातील वीज ग्राहकांना सोमवारची रात्र उकाड्यात काढावी लागली. रात्री साडे दहा वाजता पहिल्यांदा तीन वेळा वीज गायब झाली. त्यानंतर सव्वा अकरा वाजता विजेच्या तीन प्रवाहांपैकी एक प्रवाह बंद पडला. त्यामुळे निम्म्या उपनगरात वीज आणि अनेक घरांमध्ये अंधार अशी स्थिती निर्माण झाली. विजेच्या लपंडावामुळे हैराण झालेले अनेक कळंबोलीकर रात्रीच रस्त्यावर उतरले आणि त्यांनी उपनगरातील सिडको कार्यालयासमोरील वीज उपकेंद्रात धाव घेतली. उपकेंद्रातील कर्मचाऱ्यांना वीज कधी येणार, असा प्रश्नांचा भडीमार करण्यात आला. जमावातील तरुणांची संख्या वाढू लागल्याने तेथे कळंबोली पोलिसांना पाचारण करण्यात आले. अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांच्या सुरक्षेत महावितरणच्या उपकेंद्राचे प्रवेशद्वार बंद करण्यात आले. त्यामुळे तेथे जमलेल्या नागरिकांची संख्या आणखी वाढली. या दरम्यान महावितरणकडून वाढलेल्या वीज मागणीमुळे दुरुस्तीचे काम सुरू असून काही वेळात वीजपुरवठा पूर्ववत होईल, असे सांगण्यात आले. अखेर रात्री एक वाजता वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. विशेष म्हणजे शनिवार आणि रविवारीदेखील रात्री अकराच्या सुमारास अशाच प्रकारे वीजपुरवठा खंडित झाला होता.
कामोठे उपनगरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने तेथील रहिवाशांनी शनिवारी मध्यरात्री उत्स्फूर्त रास्तारोको करून महावितरणच्या अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले होते. त्यानंतर महावितरणचे कार्यकारी संचालक धनंजय औंढेकर यांनी सोमवारी कामोठे उपकेंद्राला भेट देऊन अभियंत्यांसमवेत आढावा घेतला. त्यांच्या निर्देशानुसार सोमवारी रात्री कामोठ्यात अखंडित वीजपुरवठा राखण्यासाठी अधिकारी व कर्मचारी कार्यरत होते. मात्र कामोठ्यात वीजपुरवठा सुरळीत राहिला असताना कळंबोलीत वीजपुरवठा खंडित झाला. विकसित पनवेल परिसरात मोठ्या प्रमाणावर गृहप्रकल्प उभारले जात असल्याने आणि उन्हाळ्यात रात्रीच्या वेळेत वीजेची मागणी वाढत असल्याने महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे विशेष लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.







