। मुंबई । प्रतिनिधी ।
महावितरण कोकण प्रादेशिक विभागाचे सह व्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे यांनी भांडूप परिमंडल अंतर्गत ठाणे, वाशी व पेण मंडळातील सर्व कार्यकारी अभियंता, अति. कार्यकारी अभियंता, उपविभागिय अभियंता यांची आढावा बैठक घेतली. यावेळी भांडूप परिमांडलचे मुख्य अभियंता धनंजय औंढेंकर प्रामुख्याने उपस्थित होते.
वीजबिलाची थकबाकी वाढत असून वीजबिल वसुली करण्यासाठी, वीजचोरी रोखण्यासाठी, तसेच वीज वितरण हानी कमी करण्यासाठी होत असलेल्या कामाबाबत उपविभागनिहाय आढावा महावितरण कोकण प्रादेशिक विभागाचे सह व्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे यांनी घेतला. यावेळी, तिन्ही मंडळाचे अधीक्षक अभियंता अरविंद बुलबुले, राजाराम माने व इब्राहिम मुलाणी यांनी आपल्या मंडळात वसुलीला गती देण्यासाठी सुरु असलेल्या कामाबाबत सादरीकरण केले.
डांगे म्हणाले की, ग्राहकांना उत्तम सेवा देतांना त्यांनी वापरलेल्या विजेचे देयक वसुल करणे ही तितकेच गरजेचे असते. महावितरण सुद्धा एक ग्राहक असून ग्राहकांना वीजपुरवठा करण्यासाठी महानिर्मिती कंपनीकडून वीज विकत घ्यावी लागते. त्यामुळे जर ग्राहकांनी वापरलेल्या विजेचे पैसे वेळेत भरले नाही तर ग्राहकांना अखंडित वीजसेवा देणे कठीण होईल. सहकार्य न करणार्या थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी अभियंत्यांना दिले. तसेच वीजचोरी करणार्या ग्राहकांविरुद्ध नियमानुसार कठोर कारवाई करण्याचेही त्यांनी सांगितले. घरघुती ग्राहकांसोबतच व्यावसायिक, औद्योगिक, स्ट्रीटलाईट, पाणीपुरवठा तसेच सरकारी आस्थापनांचीही वीज बिल वसुली करावी.
कोणतीही इतर सेवा जसे की डिश टीव्ही, मोबाईल इत्यादी साठी आपल्याला ठराविक वेळेत भरणा करावा लागतो. मात्र, ग्राहक वीज सारख्या मूलभूत सेवेला प्राधान्य देत नाही. म्हणून ग्राहकांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन थकीत व चालू बिलाचा भरणा करुन महावितरणला सहकार्य करावे असे आवाहन डांगे यांनी केले.