कुडपणचे जवान सचिन चिकणे यांनाही समाजाकडून श्रध्दांजली
1 सप्टेंबरलाच पोलादपूरच्या देशप्रेमी जनतेच्या मनावर आघात
पोलादपूर | शैलेश पालकर |
बुधवार दि. 1 सप्टेंबर 2021 हा दिवस पोलादपूर तालुक्यातील देशप्रेमी जनतेच्या मनावर आघात करणारा ठरला. लोहारे येथील धीरज शाम साळुंखे या जवानाचा दिल्ली येथे लष्करी इस्पितळात तर सचिन चिकणे या जवानाचा रूग्णालयामध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. यापैकी धीरज याचे आप्तपरिवार पोलादपूर तालुक्यात असल्याने गुरूवारी सकाळी सामाजिक स्तरावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दोन्ही जवानांना समाजातर्फे श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
धीरज साळुंखे याने 2014 मध्ये भारतीय सैन्यात कोणत्याही मार्गदर्शनाशिवाय स्वबळावर भरती होण्यात यश मिळाले. एएसइ डिपार्टमेंटमध्ये सात वर्षे नोकरी करीत असताना 2017 मध्ये लग्न होऊन 1 मुलगाही झाला. गेल्या दीड वर्षापूर्वी त्याला ब्लड कॅन्सर असल्याचे निदान झाल्याने त्याच्यावर दिल्लीतील लष्करी इस्पितळामध्ये उपचार सुरू झाले. दोनच महिन्यांपूर्वी धीरज यांने ब्लड कॅन्सरवर मात करून पुन्हा डिपार्टमेंटमध्ये रूजू होऊन लष्करी सेवेला सुरूवात केली. गेल्या चार पाच दिवसांपासून धीरज याला अस्वस्थ वाटू लागल्याने पुन्हा दिल्लीतील लष्करी इस्पितळामध्ये दाखल झाल्यानंतर आजार बळावल्याने बुधवारी पहाटे त्याची प्राणज्योत मालवली.
दिल्ली येथील लष्करीतळामध्ये जवान धीरज साळुंखे आणि जवान सचिन चिकणे यांना लष्करी इतमामात सलामी देण्यात आल्यानंतर धीरज याचे पार्थिव मुंबईला रवाना झाले. मुंबईमध्येही जवान धीरज साळुंखे यांना सलामी देण्यात येऊन पार्थिव नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. जवान सचिन चिकणे याचे पार्थिव पुणे येथे नातेवाईकांकडे रवाना करण्यात येऊन तेथे अग्निसंस्कार करण्यात आल्याची माहिती यावेळी प्राप्त झाली.
पोलादपूर येथे जवान धीरज यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा सजवलेल्या ट्रकवरून ‘जबतक सूरज चाँद रहेगा। धीरज तेरा नाम रहेगा।’अशा घोषणांनी आसमंत दुमदुमत काढण्यात आली. पोलादपूरच्या तहसिलदार दिप्ती देसाई, निवासी नायब तहसिलदार समीर देसाई, एपीआय प्रशांत जाधव यांनी शासनातर्फे पुष्पचक्र अर्पण करून श्रध्दांजली वाहिली. यावेळी समाजातर्फे माजी उपसभापती संभाजी साळुंखे, रघुनाथ वाडकर, नामदेव उतेकर, राजिप सदस्य चंद्रकांत कळंबे, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील प्रतिनिधी जाधव आदींनी जवान धीरज यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. याप्रसंगी उपस्थितांनी जवान सचिन गणेश चिकणे यांनाही श्रध्दांजली अर्पण केली.
बुधवारी धीरजच्या मृत्यूची बातमी पोलादपूरकरांना शोकाकूल करीत असताना दुपारी कुडपण येथील जवान सचिन चिकणे याच्या उपचारादरम्यान झालेल्या मृत्यूची बातमी धडकली आणि संपूर्ण पोलादपूर तालुक्यातील देशप्रेमी जनतेवर दु:खाचे सावट पसरले.