। नवी दिल्ली। वृत्तसंस्था ।
पोर्तुगालचा कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि विक्रम यांचं समीकरण गेल्या काही दिवसात जुळून आले आहे. यूरो कप स्पर्धेतही सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम त्याने आपल्या नावावर केला आहे. ख्रिस्तियानो रोनाल्डोने यूरो चषकाच्या साखळी फेरीत 5 गोल झळकावले होते. या गोलसह त्याने आंतराष्ट्रीय सामन्यात सर्वाधिक गोल करणार्या इराणचा माजी स्ट्रायकर अली डेई याच्याशी बरोबरी साधली होती. अली डेईने आंतराष्ट्रीय सामन्यात 109 गोल झळकावले आहेत. मात्र हा विक्रम आता ख्रिस्तियानो रोनाल्डोनो मोडीत काढला आहे. फुलबॉल विश्वचषकातील ग्रुप ए मधील पात्रता फेरीत पोर्तुगालने आयर्लंडला 2-1 ने पराभूत केलं. या सामन्यात ख्रिस्तियानो रोनाल्डोने दोन गोल झळकावले. त्यामुळे आता आंतरराष्ट्रीय सामन्यात त्याचे 111 गोल झाले आहे. सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम आता पोर्तुगालच्या ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या नावावर आहे.
आयर्लंड पहिल्या सत्रात पोर्तुगालवर एक गोलने आघाडी घेतली होती. त्यामुळे पोर्तुगालवर दडपण होतं. मात्र दुसर्या सत्रात पोर्तुगालने आक्रमक खेळी केली. मात्र शेवटच्या काही मिनिटांपर्यंत बरोबरी साधण्यात त्यांना अपयश आलं. मात्र सामन्याच्या 89 व्या मिनिटाला ख्रिस्तियानो रोनाल्डोनो गोल झळकावत बरोबरी साधून दिली. तसेच अली डेईचा विक्रम मोडीत काढला. त्यानंतर अतिरिक्त वेळेत दुसरा गोल झळकावत विजय मिळवून दिला. या दोन गोलसह ख्रिस्तियानो रोनाल्डोची आंतरराष्ट्रीय सामन्याची गोल संख्या ही 111 इतकी झाली आहे.