सुधागडमध्ये 83 शिक्षकांच्या जागा रिक्त
। पाली । वार्ताहर ।
जिल्हा परिषदेच्या शाळांतील पटसंख्या वाढावी यासाठी उपक्रम राबवले जातात. मात्र, अनेक शाळांमध्ये शिक्षकच नसल्याने विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होत आहे. सुधागड तालुक्यात जवळपास 350 पदे आहेत. मात्र, त्यापैकी 83 जागा रिक्त आहेत, तर चार शाळांमध्ये एकही शिक्षक नसल्याचे समोर आले आहे.
तालुक्यात उपशिक्षकांची 61 तर पदवीधर शिक्षकांची 29 पदे रिक्त आहेत. नागशेत येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत एकच शिक्षक कार्यरत असून, त्यांच्यावर सात वर्ग सांभाळण्याची जबाबदारी असल्याने पुरती दमछाक होते. या शाळेत 2 पदवीधर, 2 उपशिक्षक अशा शिक्षकांच्या जागा आहेत. परंतु, सद्यःस्थितीत एकच पदवीधर शिक्षक कार्यरत आहे.
शाळेचा डोलारा शिक्षकांवरच अवलंबून असतो, मात्र मनुष्यबळाअभावी एकेका शिक्षकावर चार ते पाच वर्ग सांभाळण्याची वेळ आली आहे. याशिवाय शाळांमध्ये सरकारी उपक्रम राबवणे, त्याबाबत जनजागृती शाळाबाह्य मुलांचा शोध, स्वच्छता अभियान, पोषण, आहार, वृक्षारोपण आदी उपक्रमातही सहभागी व्हावे लागत असल्याने कार्यरत शिक्षकांची फरफट होत आहे.
एकही शिक्षक नसलेल्या शाळा
खडसांबळे शाळा 12 विद्यार्थी
पिंपळोली शाळा 13 विद्यार्थी
फणसवाडी शाळा 3 विद्यार्थी
(हे विद्यार्थी गोमाशी शाळेत बसवतात)
वैतागवाडी शाळा 5 विद्यार्थी
उपशिक्षक मंजूर पदे – 312 यातील रिक्त 61
पदवीधर शिक्षक मंजूर पदे 44 यातील रिक्त 21
पदोन्नती मुख्यध्यापक मंजूर पदे 2 यातील रिक्त 1
एकूण रिक्त पदे 83
जिल्हा परिषदेमध्ये आता दर्जेदार अध्यापन व भौतिक सुविधाही मिळतात. मात्र, पटसंख्येनुसार शिक्षक नसतील तर शैक्षणिक गुणवत्ता कशी टिकविणार, कार्यरत शिक्षकांवर अतिरिक्त भार किती दिवस टाकणार, असा प्रश्न असून लवकर लवकर शिक्षकांची भरती व नियुक्ती करण्यात यावी,
रवींद्रनाथ ओव्हाळ, सामाजिक कार्यकर्ते, सुधागड
सुधागडमध्ये आठ शाळांत एकही शिक्षक नव्हता, समायोजन व आंतरजिल्हा बदलीने चार शाळांमध्ये शिक्षक नियुक्त केले आहेत, उर्वरित शाळांसाठीही प्रयत्न सुरू आहेत. शिवाय पटसंख्येच्या तुलनेत ज्या शाळेत शिक्षक कमी आहेत, तिथे शिक्षक देऊन व्यवस्थापन केले जात आहे.
साधुराम बांगारे, गटशिक्षणाधिकारी, सुधागड