तरुण पिढी व्यसनाच्या विळख्यात जाण्याची भीती
। पेण । प्रतिनिधी ।
पेण शहरातील फणस डोंगरी पाण्याच्या टाकी जवळ, मोतीराम तलाव, जुना भुडा पुल, कासमाल, बोरगाव रोड, रेल्वे पूल परिसर, अंतोरा, पाटणेश्व फाटा, शिवाजीनगर रामवाडी तसेच रामवाडीतील ‘पब्जी रोड’ या भागांमध्ये गांजा विक्रीचे प्रमाण वाढल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या वाढत्या अवैध कारवायांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
विशेष म्हणजे, या विक्रीत 20 ते 25 वयोगटातील तरुण मुलं-मुलींचा सहभाग असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे तरुण पिढी व्यसनाधीनतेकडे झुकत असल्याची भीती व्यक्त केली जात असून, याचा समाजावर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, कायद्यातील विविध तरतुदी तसेच प्रक्रियात्मक अडचणींमुळे पोलिसांना अपेक्षित ती कठोर कारवाई करता येत नाही. त्यामुळे संबंधितांवर कारवाई करण्यात अडथळे निर्माण होत असल्याचे चित्र आहे. यामुळे अवैध विक्रेत्यांचे मनोबल वाढत असल्याचीही चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. दरम्यान, वाढत्या गांजा विक्रीमुळे शहरातील सामाजिक वातावरण बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकूणच, पेण शहरात वाढत चाललेली ही गंभीर समस्या वेळीच रोखली नाही, तर त्याचे परिणाम समाजासाठी घातक ठरू शकतात, अशी भीती व्यक्त होत आहे.
