रेवदंडा-चौलच्या मँग्रोव्हवर कचऱ्याचा घाला

बेफिकीर नागरिकांवर कारवाईची मागणी

| रेवदंडा | प्रतिनिधी |

रेवदंडा-चौल बाह्यवळण मार्गालगत रस्त्याच्या कडेला आणि लगतच्या खाडीत सर्रास कचरा टाकला जात आहे. त्यामुळे परिसरातील पर्यावरणासह मौल्यवान मँग्रोव्ह (खारफुटी) वनसंपदा गंभीर धोक्यात आली आहे. प्लास्टिकसह विविध प्रकारचा कचरा थेट खाडीत फेकला जात असल्याने समुद्री जैवविविधतेवर विपरीत परिणाम होत असून, स्थानिक पर्यावरणप्रेमींनी याबाबत तीव्र चिंता व्यक्त केली आहे.

रेवदंडा-चौल बाह्यवळण मार्गालगत खाडीत फेकला जाणारा प्लास्टिकचा कचरा भरती-ओहोटीच्या पाण्यासोबत वाहत जाऊन मँग्रोव्हच्या मुळांमध्ये अडकून राहतो. त्यामुळे पाण्याचा नैसर्गिक प्रवाह बाधित होण्याबरोबरच पाण्याच्या गुणवत्तेवरही परिणाम होत आहे. त्याचा फटका मँग्रोव्ह परिसरातील वनस्पती, मासे, खेकडे, पक्षी आणि इतर जलचर जीवांना बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या समस्येचा परिणाम केवळ पर्यावरणापुरता मर्यादित नसून, पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होण्याचाही धोका वाढला आहे. चौल भाटगल्ली, मुखरी गणपती गल्ली इत्यादी भागांतील पावसाचे पाणी याच खाडीतून वाहून जाते. मात्र, कचऱ्यामुळे पाण्याचा निचरा अडथळला गेल्यास पावसाळ्यात पाणी घरांमध्ये शिरण्याची शक्यता स्थानिकांनी व्यक्त केली आहे.

विशेष म्हणजे, परिसरात अधिकृत कचरा संकलनाची व्यवस्था आणि डंपिंगची सुविधा उपलब्ध असतानाही काही नागरिकांकडून बेजबाबदारपणे रस्त्याच्या कडेला व खाडीत कचरा फेकला जात असल्याने ही समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे. कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई, संबंधित ठिकाणी सीसीटीव्ही बसविणे, नियमित स्वच्छता मोहीम राबविणे तसेच मँग्रोव्ह परिसरातील प्लास्टिकचा कचरा त्वरित हटविणे आणि नागरिकांमध्ये जनजागृती करणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे.

Exit mobile version