प्रवाशांना दुर्गंधीतून काढावा लागतो मार्ग
| उरण । वार्ताहर ।
नवी मुंबईचाच भाग म्हणून विकसित होत असलेल्या उरणमध्ये वाढत्या नागरीकरणामुळे तालुक्यातील कचर्याची समस्या गंभीर झाली आहे. तालुक्यातील ग्रामपंचायतींना कचराभूमीची जागा नसल्याने ग्रामपंचायतीकडून गावातील कचरा गावा शेजारील रहदारीच्या रस्त्यावर टाकण्यात येत आहे. त्यामुळे उरण तालुक्यातील अनेक गावांना व विभागातील रस्ते हे गावातील कचऱ्यांनी भरू लागले आहेत. सततच्या पावसामुळे हा कचरा कुजू लागल्याने या मार्गाने प्रवास करणार्या प्रवासी व नागरिकांना निर्माण होणार्या दुर्गंधीचा त्रास सहन करत नाक मुठीत ठेवून प्रवास करावा लागत आहे.
उरण तालुक्यात 35 ग्रामपंचायती, एक नगरपरिषद व नव्याने विकसित होणारे द्रोणागिरी नोड शहर या परिसरातील वाढत्या नागरीकरणामुळे कचराही वाढला आहे. एकीकडे सरकार कडून स्वच्छता अभियान व स्पर्धा आयोजित केल्या जात असतांना उरणमधील नागरपरिषदेला कचराकुंडी नसल्याने पनवेलमधील कचराभूमीत 40 किलोमीटर अंतरावर नगरपरिषदेतील कचरा वाहून न्यावा लागत आहे. ग्रामपंचायतीमध्ये निर्माण होणार्या कचर्याची विल्हेवाटीची समस्या वाढली आहे. या निर्माण होणार्या कचर्याची विल्हेवाट लावण्यासाठी सिडकोच्या माध्यमातून भूखंड तर येथील मोठ्या उद्योगांकडून निधी मिळावा अशी मागणी पंचायत समितीच्या वतीने वारंवार करूनही त्याकडे दुर्लक्ष केली जात आहे. त्यामुळे गावागावांतील कचर्याचा प्रश्न गंभीर बनू लागला आहे.
कचर्याची समस्या आणखी वाढण्याची शक्यता
सध्या उरणचा विकास झपाट्याने होत असतांना कचर्याची समस्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून उरण मधील निर्माण होणार्या कचर्याची विल्हेवाट लावण्यासाठी लवकरात लवकर उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.