वायूगळती प्रकरणी कंपन्यांना ‘दणका’

दोषी कंपन्यांवर कठोर कारवाई करणार – राज कामत
| रोहा | प्रतिनिधी |

रोहा धाटाव एमआयडीसीतील कंपन्यांतील विषारी वायू गळतीची जिल्हाधिकारी रायगड प्रशासनाने दखल घेत आदेशान्वये रोहा तहसील प्रशासनाने रोहा डायकेम, राठी डायकेम मुख्यतः अन्शूल कंपनीची झाडाझडती घेतली. तर उशिरा एमपीसीबी प्रशासन अधिकार्‍यांनी वायू गळतीप्रकरणी अन्शूल, रोहा डायकेम, ट्रान्सवर्ड कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावून दणका दिल्याचे समोर आले.
धाटाव एमआयडीसीतील अनेक कंपन्यांनी जल, वायू प्रदूषण करणे सुरूच ठेवले. विषारी प्रदूषण रोखण्यात एमपीसीबी प्रशासन अधिकारी कायम अपयशी ठरले. त्यातूनच प्रदूषण करण्यात कंपन्यांचे धाडस वाढले. याच गंभीर प्रकारात बुधवारी रात्रौ विषारी वायू गळतीने तब्बल पाच जणांना बाधा झाल्याची खळबळजनक घटना घडली. याबाबत एमपीसीबीकडे तक्रार करण्यात आली. मात्र, नेहमीप्रमाणे एमपीसीबीचे अधिकारी कमालीचे गाफील राहिले. मात्र, विभागीय अधिकारी राज कामत यांनी वायू गळती घटनेच्या पार्श्‍वभूमीवर अन्शूल व अन्य कंपनीवर धडक देऊन पाहणी केली. त्यात अन्शूल कंपनी संशयाच्या भोवर्‍यात अडकल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार कारवाई सुरू असल्याचे सांगण्यात आले. संबंधित दोषी कंपनीवर कठोर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट संकेत राज कामत यांनी दिल्याने आतातरी वायू गळती प्रकरणातील दोषी कंपन्यांवर योग्य ती कारवाई होते का? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.


धाटाव एमआयडीसीतील अन्शूल, राठी डायकेम, ट्रान्सवर्ड, रोहा डायकेम, युनिकेम व अन्य कंपन्या राजरोस जल वायू प्रदुषण करीत आलेत. त्यासंबंधी एमपीसीबीकडे वारंवार तक्रारी झाल्या. मात्र, कारवाईबाबत एमपीसीबी अधिकारी नेहमीच खाते धोरण राबवित असल्याने आतापर्यंत तक्रारीतील युनिकेम, अन्शूल, राठी डायकेम, ट्रान्सवर्ड कंपनीवर ठोस कारवाई झाली नाही, ही गंभीर बाब असतानाच बुधवारी रोहा डायकेम, राठी डायकेमलगत पाच ग्रामस्थांना विषारी वायूची बाधा झाली आणि जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. विषारी वायू गळतीच्या घटनेनंतर रोहा तहसील प्रशासनाने राठी डायकेम, रोहा डायकेम, अंन्शूल व अन्य कंपन्यांची झाडाझडती घेतली. त्यासंबंधी अहवाल जिल्हा प्रशासनाला पाठविण्यात येईल अशी माहिती चेतन केंडे यांनी दिली. तर तक्रारीनंतर उशीरा का होईना एमपीसीबीने रोहा डायकेम, ट्रान्सवर्ड मुख्यतः अन्शूल कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावली.

Exit mobile version