| पाली/बेणसे | वार्ताहर |
पालीच्या माजी नगराध्यक्ष गीता पालरेचा यांच्यासह अनेक कार्यकर्ते पुन्हा राष्ट्रवादीमध्ये सहभागी होणार असल्याचे वृत्त आहे. गेल्या वर्षी पालरेचा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र राज्यातील सत्तेची समीकरणे बदलताच त्यांना पुन्हा स्वगृही परतण्याचे वेध लागले. सुधागड तालुक्यात येणाऱ्या काळात राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेले अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी पुन्हा राष्ट्रवादीत जाण्याची दाट शक्यता आहे. अजित पवारांकडे तिजोरीच्या चाव्या आहेत. त्यामुळे निधी वितरण हे दादांकडे आहे. त्यामुळे रायगडात येत्या काळात तटकरे यांच्यापासून दूर गेलेले पदाधिकारी कार्यकर्ते पुन्हा राष्ट्रवादीत येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
गीता पालरेचा यांचा प्रवेश होऊन काही महिने झाले तरी त्यांच्या हाती पक्षाची कुठल्याही प्रकारची धुरा न आल्याने शिवाय कार्यकर्त्यांना हवा तसा मानसन्मान मिळत नसल्याचे बोलले जात आहे. भाजपमध्ये त्यांची घुसमट होत असल्याचे कार्यकर्ते सांगत आहेत. यामुळेच पालरेचा यांच्या समवेत गेलेले सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी पुन्हा सुनील तटकरे यांच्या बरोबरीने राष्ट्रवादीमध्ये जाण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे.
पालरेचा यांनी याबाबत अद्याप पर्यंत कोणतीही उघड भूमिका स्पष्ट केली नसली तरी ज्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या साथीने, व भरवशावर त्या भाजपात गेल्या त्या कार्यकर्त्यांनी जर राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधले तर पालरेचा यांना देखील राष्ट्रवादीची वाट धरावी लागेल असे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.