रायगडमध्ये शाळांचे जिओ टॅगिंग

तांत्रिक अडचणीमुळे एक शाळा बाकी; राज्यात 1941 शाळांची कार्यवाही प्रलंबितच

| रायगड | प्रतिनिधी |

राज्यात अद्यापही 1941 शाळांनी जिओ टॅगिंगची प्रक्रिया पूर्ण करण्याकडे पाठ फिरवली आहे. सर्व शाळांचे जिओ टॅगिंग झालेले राज्यात पाच जिल्हे आहेत. राज्यातील सर्व शाळांबाबतची माहिती केंद्र शासनाच्या यूडायस प्लस या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. रायगड जिल्ह्यातील 3 हजार 568 शाळांची जिओ टॅगिंगची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. केवळ एका शाळेची जिओ टॅगिंगची प्रक्रिया तांत्रिक अडचणीमुळे अपूर्ण आहे. यामुळे रायगड जिल्ह्याचे जिओ टॅगिंगची प्रक्रिया 99.97 टक्के पूर्ण झाली आहे. त्यात शाळा, विद्यार्थिसंख्या, शिक्षकसंख्या, शाळांमध्ये उपलब्ध भौतिक सुविधा, संगणकीय सुविधा यांबाबत माहितीचा समावेश आहे.

या माहितीचा उपयोग आणि वापर शासनस्तरावर विविध धोरणे, कार्यक्रमांची आखणी, तसेच अंमलबजावणी आराखडा तयार करताना होतो. मात्र, गाव, चावड्या, वस्ती यांचे ठिकाण, लोकसंख्येची घनता, तसेच उपलब्ध जिल्हा, राज्यमार्ग, महामार्ग, राष्ट्रीय महामार्ग, दोन शाळांमधील अंतर, शाळांच्या नजीक शासनाच्या इतर विभागांद्वारे उपलब्ध सोयीसुविधा याबाबतची माहिती शालेय शिक्षण विभागाकडे उपलब्ध नसल्याने अंगणवाड्यांसह शाळांचे ‘जिओ टॅगिंग’ करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन सेंटरशी (एमआरएसएसी) करार करण्यात आला. महाजीआयएस संकेतस्थळावरील 12 मे रोजीच्या आकडेवारीनुसार राज्यातील 1 लाख 8 हजार 15 शाळांपैकी 1 लाख 6 हजार 74 शाळांनी जिओ टॅगिंग प्रक्रिया पूर्ण केली आहे. तर, 1 हजार 941 शाळांनी जिओ टॅगिंगची प्रक्रिया केलेली नाही. सर्व शाळांची जिओ टॅगिंग प्रक्रिया पूर्ण केलेले गडचिरोली (1191), नंदुरबार (2096), धारशिव (1808), बुलढाणा (2485 ) आणि भंडारा (1289) हे पाच जिल्हे आहेत.

रायगड जिल्ह्यातील 3569 शाळांचे जिओ टॅगिंगचे काम शासनाच्या निर्देशानुसार पूर्णत्वाकडे नेण्यात आले आहे. केवळ एका शाळेची जिओ टॅगिंग करण्याचे काम तांत्रिक अडचणीमुळे थांबले आहे. त्यामुळे जिल्ह्याचे काम शंभर टक्के झाले नसलेतरी 99 . 97 टक्के जिओ टॅगिंगचे काम पूर्ण झाले आहे.

जिओ टॅगिंग न झालेल्या शाळांमध्ये छत्रपती संभाजीनगर, नागपूर जिल्ह्यातील शाळा सर्वाधिक आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 452, नागपूर जिल्ह्यातील 353, कोल्हापूर जिल्ह्यातील 158, धुळे जिल्ह्यातील 127, नाशिक जिल्ह्यातील 122, सांगली जिल्ह्यातील 120, जालना जिल्ह्यातील 116 शाळांनी जिओ टॅगिंग प्रक्रिया पूर्ण केलेली नाही.

प्रक्रिया 13 मेपर्यंत पूर्ण करा
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण सहसंचालक श्रीराम पानझाडे यांनी विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक यांना शाळांच्या जिओ टॅगिंगची प्रक्रिया 13 मेपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
Exit mobile version