शासनाकडून घरकुल लाभार्थींची कुचेष्टा?

वाळू नसणाऱ्या ठिकाणचे दिले परमिट

| तळा | प्रतिनिधी |

शासनाने घरकुल लाभार्थ्यांना ‌‘पाच ब्रास वाळू मोफत’ या नावाने दिलेले परमिट म्हणजे लाभार्थ्यांची कुचेष्टा म्हणावी लागेल, अशी वस्तुस्थिती आहे. कारण, ज्या ठिकाणचे वाळूच परमिट दिले आहे, त्याठिकाणी वाळूच उपलब्ध नाही, असे लाभार्थ्यांचे म्हणणे आहे. घरकुलांचे काम तळा तालुक्यात आणि परमिट दिलेय पेण तालुक्याचे. लाभार्थ्यांची ही एकप्रकारे कुचेष्टाच शासनाने चालविली असून, याबाबत नाराजी व्यक्त होत आहे.

तळा तालुक्यात शासनाच्यावतीने प्रधानमंत्री घरकुल योजनेंतर्गत अनेक घरकुलांची कामे सुरू आहेत. यापैकी 265 घरकुले लाभार्थ्यांना तळा महसूल विभागाच्यावतीने पाच ब्रासचे रॉयल्टीचे परवाने दिले आहेत. परंतु, हे परमिट पेण तालुक्यातील जांभुळ या भागातील दिले आहेत. मात्र, या ठिकाणी वाळू उपलब्ध नाही. ही नदी खूप खोल असल्याने लाभार्थ्यांना ही वाळू पावसात काढणे कठीण आहे. शिवाय, पेण आणि तळा हे अंतर पाहता, गाडी भाडेसुद्धा न परवडणारे असे आहे. ही बाब लक्षात घेऊन रायगड जिल्हाधिकारी यांनी तळा तालुक्यात असलेल्या खाडी पट्ट्यात रहाटाड, मांदाड या भागात हे परमिट बदलून दिल्यास ते या लाभार्थ्यांना अंतर जवळ पडेल. याशिवाय वाळू हातपाटीने काढणे अन्‌‍ प्रवास भाडेही परवडेल, अन्यथा एवढ्या लांबून ही मोफत वाळू कुणीही आणायला धजावणार नाही. याचा शासकीय वरिष्ठ पातळीवर विचार होणे अत्यंत गरजेचे असून, याचा विचार शासन स्तरावर जिल्हाधिकारी यांनी करावा, अशी मागणी तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांनी केली आहे. सध्या पाऊस असल्याने वाळू मोठ्या पाण्यात मनुष्यबळाने काढणे शक्य नाही. त्यासाठी दिलेले परमिट हे 10 जुलै ते 10 ऑगस्ट 2025 या कालावधीसाठी दिले आहेत. पाऊस आणि पुढे गणपती सणात अवजड गाड्यांना बंदी असल्यामुळे त्यांची मुदत वाढवून मिळावी, अशीही मागणीही केली जात आहे.

Exit mobile version