सुधाकर राठोड यांचा गौरव

। रसायनी । वार्ताहर ।

इरसाल वाडी दुर्घटनेत जीवाची बाजी लावत रात्रंदिवस मेहनत करणार्‍या निवासी नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कौतुक करून त्यांना प्रशस्ती पत्र दिले.

नवी मुंबई येथील एका कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इरसाल वाडी दुर्घटनाग्रस्तांना नवीन घरांच्या चाव्या दिल्या. एका वर्षात इरसाल वाडीतील नागरिकांचा सर्व सुविधांनी सुसज्ज अशा घरात गृह प्रवेश झाला. कोणत्याही नैसर्गिक अथवा मानव निर्मित आपत्तीमध्ये बचाव कार्यासाठी धैर्य आवश्यक असते, तर पुनर्निर्माणासाठी इच्छा शक्ती, प्रयत्नांची पराकाष्ठा करून अनेकांना जीवदान दिले, आणि पुनर्वसन करण्यासाठी जीवाचे रान केले. म्हणूनच एका वर्षात आपण हे पुनर्वसन करू शकलो,असे मुख्यमंत्री यांनी आपल्या प्रशस्ती पत्रात नमूद करून नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांचे कौतुक केले आहे. तत्कालीन उपविभागीय अधिकारी अजित नैराळे, तहसीलदार आयुब तांबोळी आणि नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांनी चोवीस तास कार्यरत राहून काम केले आहे. नायब तहसीलदार सुधाकर राठोड हे दुर्घटना घडली तेव्हापासुन इरसाल वाडी वर लक्ष ठेऊन होते. शोध मोहीम आटोपली की काळोखी संध्याकाळी डोंगरावरून खाली यायचे आणि पहाट झाली की पुन्हा मोहिमेवर जायचे. पोलीस, मदत कार्य करणारी टीम, वैद्यकीय पथक यांच्या अगोदर ते जायचे, या दरम्यान त्यांच्या पायाला जखमा देखील झाल्या होत्या. रात्री कार्यालयात बसून पाच दिवस त्यांनी पुनर्वसनाबाबतचे काम केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इरसाल वाडी दरडग्रस्तांना घराच्या चाव्या प्रदान करण्याच्या कार्यक्रमात हे प्रशिस्त पत्र दिले. हे पत्र पाठविल्यावर निवासी नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Exit mobile version