गोव्यातील गंमत

गोव्यात सतत राजकीय गमतीजमती चालू असतात. तिथला कोणीही नेता कधीही कोणत्याही पक्षाबरोबर जाऊ शकतो. बुधवारी काँग्रेसचे आठ आमदार भाजपमध्ये दाखल झाले. यामध्ये माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत आणि विरोधी पक्षनेते मायकेल लोबो यांचा समावेश आहे. कामत हे 1990 च्या दशकात भाजपच्या तिकिटावर आमदार झाले. नंतर मनोहर पर्रीकर मंत्रिमंडळात ते वरिष्ठ नेते होते. मग तिथून ते फुटले. काँग्रेसने त्यांना मुख्यमंत्री केले. कामत यांना मडगावमधून पाडण्यासाठी पर्रीकर आणि भाजपने नंतर जंग जंग पछाडले. पण त्यांना ते जमले नाही. गेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसची चांगली कामगिरी होईल व आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळेल असा कामत यांचा होरा होता. पण काँग्रेसच्या दिल्लीकर नेत्यांचे डोके वेगळ्याच दिशेने चालते. जो लोकप्रिय असेल आणि ज्याला जनाधार असेल त्याचे पाय कापण्याचे काम तिथे सर्वात आधी होते. त्यानुसार कामत यांना डावलून मायकेल लोबो यांना महत्व देण्यात आले. लोबो मूळचे भाजपचे. पण ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये आले. त्यांचे येणे म्हणजे गोव्यात भाजपच्या विरोधात वातावरण तयार होते आहे याचे निदर्शक आहे, अशी हवा तयार करण्याचा प्रयत्न तेव्हा काँग्रेसने केला. त्यातून लोबो यांना प्रचंड महत्व देण्यात आले. प्रत्यक्षात चाळीसपैकी वीस जागा मिळवून भाजप सत्तेत आला. त्याला मगो पक्षाने पाठिंबा दिला. त्यानंतर किमान विरोधी पक्षनेतेपद किंवा प्रदेशाध्यक्षपद आपल्याला मिळावे अशी कामत यांची इच्छा होती. पण काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी लोबोंना विरोधी पक्षनेता केले. त्यामुळे कामत भाजपमध्ये पुन्हा जाणार हे पूर्वीच नक्की झाले होते. पर्रीकर यांना त्यांनी पूर्वी दगा दिलेला असल्याने पक्षात घ्यायला स्थानिक भाजप नेत्यांचा विरोध होता. तोच एक मोठा अडसर होता. पण सध्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे भाजपच्या श्रेष्ठींच्या मर्जीतले आहेत. पर्रीकर हा अध्याय त्यांच्या लेखी इतिहासजमा आहे हे सावंत यांनी अचूक ओळखले. त्यानुसार कामत यांना प्रवेश मिळाला. मधल्या काळात लोबो यांच्या हॉटेलांच्या विरोधात राज्य सरकारने कारवाई सुरू केली होती. लोबो यांच्या पत्नीदेखील आमदार व स्थानिक गावच्या सरपंच आहेत. आम्ही भाजपमध्ये होतो तोवर आमच्या हॉटेलांचे बांधकाम कधीही खटकले नाही, आता काँग्रेसमध्ये आलो तर ते अनधिकृत ठरले अशी टीका त्यांनी काही महिन्यांपूर्वी केली होती. पण भाजपच्या सत्तेशी फार पंगा घेणे आपल्याला झेपणार नाही हे लोबो पती-पत्नींना लगेचच उमगलेले दिसते. आता भाजपमध्ये गेल्यावर त्यांच्याविरुध्दची कारवाई तात्काळ थंडावेल यात शंका नाही. पुढेमागे लोबो यांना मंत्रिदेखील बनवले जाईल. काँग्रेसमधील हे बंड दोन महिन्यांपूर्वीच होणार होते. पण त्यावेळी फुटीसाठी आवश्यक दोनतृतियांश लोक न जमल्याने ते बारगळले. त्यावेळी काँग्रेसने कामत व लोबो यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्याचेही ठरवले होते. तेही प्रकरण रेंगाळलेले आहे. पक्षनिष्ठा, तत्व, विचारसरणी या कशाचाही या राजकारणाशी दूरान्वयानेही संबंध नाही. पण हे फुटीर आता देवालाही घाबरेनासे झाले आहेत. निवडणुकीपूर्वी या सर्व काँग्रेस नेत्यांनी आपण निवडून आलो तर पाच वर्षे पक्ष सोडणार नाही अशी शपथ मंदिर, चर्च आणि दर्ग्यामध्ये जाऊन घेतली होती. तसं शपथपत्र सोनिया गांधींनाही धाडण्यात आलं होतं. पण आता आपण पुन्हा देवाचा कौल घेतला आणि त्यानेच मला सांगितले की तू तुला हवे ते कर, असे दिगंबर कामत यांच्यासारखे लोक सांगत आहेत. थोडक्यात यांना कसलीही नैतिक चाड राहिलेली नाही. अर्थात या सर्व प्रकाराला काँग्रेस नेतृत्वही जबाबदार आहे. सरकारी यंत्रणांच्या धमक्या देऊन भाजप फोडाफोडी करतो आहे हे सत्य आहेच. पण काँग्रेसचे नेतेही कमालीचे बेफिकिर आहेत. आमदार पक्ष सोडून जाण्याच्या मनस्थितीत असताना गेल्या दोन महिन्यांत त्यांना रोखण्यासाठी कोणतेही प्रयत्न त्या पक्षात झाले नाहीत. अर्थात गुलाम नबी आझाद वा अन्य तेवीस नाराज नेत्यांना जी वागणूक पक्षश्रेष्ठींकडून मिळाली ते पाहता गोव्यासारख्या स्थानिक नेत्यांच्या बाबतीत वेगळे काही होण्याची अपेक्षाही गैर होती. 

Exit mobile version