जुईनगरमध्ये 20 कोटींचा सोन्याचा दरोडा!

16.4 किलो सोने लंपास; कर्मचाऱ्यावर रॉडने हल्ला

| नवी मुंबई | प्रतिनिधी |

नवी मुंबईतील जुईनगर एमआयडीसी परिसरात सोन्याची वाहतूक करणाऱ्या वाहनावर चार दरोडेखोरांनी सिनेस्टाईल हल्ला करत तब्बल 16.4 किलो सोने लुटले. गुरुवारी (26 नोव्हेंबर) रात्री घडलेल्या या घटनेत दरोडेखोरांनी लोखंडी रॉडने वाहनाच्या काचा फोडून कर्मचाऱ्याला गंभीर जखमी केले आणि सुमारे 20 कोटींचा ऐवज घेऊन पलायन केले. या धाडसी दरोड्यामुळे नवी मुंबईत खळबळ उडाली आहे.

जुईनगर एमआयडीसीतील सर्व्हिस रोडवरून सोन्याची वाहतूक करणारी पांढऱ्या रंगाची टाटा एसयूव्ही जात असताना वॅगनआरमधून आलेल्या चार जणांनी तिचा पाठलाग करून वाहन अडवले. त्यानंतर लोखंडी रॉडने समोरील आणि चालकाच्या बाजूची काच फोडली. वाहनातील कर्मचारी लक्ष्मण मुखिया यांनी प्रतिकार केला असता, एका दरोडेखोराने त्यांच्या चेहऱ्यावर रॉडने वार केला. यात त्यांच्या डाव्या डोळ्याजवळ गंभीर दुखापत झाली. त्यानंतर दरोडेखोरांनी सोन्याची बॅग हिसकावून ठाण्याच्या दिशेने पळ काढला. बॅगेत सोन्याची बिस्किटे, चेन आणि अन्य दागिने होते. घटनेची माहिती मिळताच तुर्भे पोलिसांसह वरिष्ठ अधिकारी, फॉरेन्सिक पथक आणि गुन्हे शाखेच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी तुर्भे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरोडेखोरांचा शोध सुरू असून, सोन्याच्या वाहतुकीचा मार्ग आणि वेळेची माहिती त्यांना कशी मिळाली, याचाही तपास केला जात आहे.

Exit mobile version