नेरळ जंक्शनजवळ मालगाडीचे कपलिंग तुटले

मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूक पाऊण तास ठप्प
ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांचे हाल

| नेरळ | प्रतिनिधी |

नेरळ जंक्शनजवळ लोणावळ्याहून कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या रिकाम्या मालगाडीचे सीबीसी कपलिंग आणि एअर ब्रेक होस पाईप अचानक तुटल्याने रेल्वे वाहतुकीचा खोळंबा झाला. मालगाडीचे तब्बल 16 डबे नेरळ रेल्वे फाटकाच्या मध्यभागी अडकून पडल्याने मुंबईच्या दिशेने जाणारी मध्य रेल्वेची वाहतूक सुमारे पाऊण तास विस्कळीत झाली. ऐन गर्दीच्या वेळी लोकल गाड्या खोळंबल्याने प्रवाशांचे मोठे हाल झाले.

लोणावळ्याहून कल्याण जंक्शनकडे जाणारी ही रिकामी मालगाडी दुपारी सुमारे 3.45 वाजता नेरळ स्थानकाजवळ आली असता अचानक तिचे कपलिंग आणि एअर ब्रेक होस पाईप तुटले. त्यामुळे गाडीचा पुढील भाग नेरळ स्थानकात तर 16 डबे रेल्वे फाटकाच्या मध्यभागी थांबले. परिणामी रेल्वे वाहतुकीसोबतच फाटकावरील रस्ते वाहतुकीचाही खोळंबा झाला.

घटनेची माहिती मिळताच रेल्वे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम सुरू केले. कपलिंग आणि एअर ब्रेक होस पाईपची दुरुस्ती पूर्ण केल्यानंतर सायंकाळी 4.30 वाजता मालगाडी मार्गस्थ करण्यात आली. त्यानंतर रेल्वे वाहतूक पूर्ववत झाली.

मालगाडी मुख्य मार्गावर पाऊण तास उभी राहिल्याने मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या काही लोकल गाड्यांवरही परिणाम झाला. मालगाडीच्या कपलिंगऐवजी प्रवाशांनी भरलेल्या लोकलचे कपलिंग किंवा ब्रेक पाईप तुटले असते तर काय झाले असते? असा सवाल उपस्थित करत प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाच्या देखभाल आणि सुरक्षाव्यवस्थेवर नाराजी व्यक्त केली. नियमित तपासणी आणि देखभालीकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

Exit mobile version